Happy Diwali 2023: तुम्हाला तुमची दिवाळी सर्वांत खास आणि वेगळी बनवायची असेल, तर यावेळी पारंपरिक आउटफिटपेक्षा इंडो-वेस्टर्न आउटफिट ट्राय करून बघा. कारण- दिवाळीच्या दिवशी बहुतेक महिला आणि तरुणी भारतातील पारंपरिक आउटफिट जसे की, साडी, कुर्ता-पायजमा किंवा घागरा-चोळी घालण्याचा प्रयत्न करतात. पण एथनिक ड्रेस अप करणे नेहमीच थोडे कंटाळवाणे वाटते. अशा वेळी जर तुम्हाला वेस्टर्न ड्रेसअप करायला आवडत असेल, तर तुम्ही यंदा इंडो-वेस्टर्न लूक नक्की ट्राय करा.
इंडो-वेस्टर्न आउटफिट हे पाश्चात्त्य आणि दक्षिण आशियाई फॅशनचे कॉम्बिनेशन आहे. या आउटफिटचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्टायलिश दिसण्यासोबतच ते परिधान करण्यासही अतिशय आरामदायक असतात. त्यात पारंपरिक आउटफिटला एक ट्रेंडी लूक दिला जातो. त्यामुळे या आउटफिटने तुम्ही सुंदर तर दिसताच; शिवाय खूप ट्रेंडीही दिसता. त्यामुळे पाहणाऱ्याची नजर तुमच्या आउटफिट आणि लूकवर खिळून राहते.
को-ऑर्ड सेट
एथनिक कॉ-ऑर्ड आउटफिट्स आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. विशेष म्हणजे को-ऑर्ड सेट आउट ऑफ स्टाईल होत नाहीत. बाजारात को-ऑर्डर सेटच्या शेकडो डिझाइन्स उपलब्ध आहेत. हे तुम्हाला अगदी हलक्या आणि जड अशा दोन्ही डिझाइन्समध्ये मिळतील. विशेषत: ऑफिस दिवाळी सेलिब्रेशनसाठी हे आउटफिट एकदम बेस्ट आहे.
क्रॉप टॉप विद स्कर्ट
हा लूक तुमच्या एथनिक आउटफिटला एक मॉडर्न टच देतो. तुम्ही क्रॉप टॉपऐवजी कुर्ती किंवा जॅकेट स्टाईलचा ब्लाउजही घालू शकता. त्यामध्ये तुम्ही एकदम कम्फर्टेबल फिल कराल आणि क्लासी दिसाल.
इंडो-वेस्टर्न स्टाईल स्कर्ट
इंडो-वेस्टर्न स्टाईल स्कर्ट दिसायला धोती स्टाईल स्कर्टसारखा असतो; पण जर तुम्ही त्यावरील दुपट्टा साडीप्रमाणे स्टाईल केला, तर तो तुम्हाला साडीचा लूकही देतो. त्यावर तुम्ही शॉर्ट कुर्ती किंवा ब्लाउज घालू शकता.
शरारा पँट्स
इंडो-वेस्टर्नची खास गोष्ट म्हणजे तुम्ही ती तुमच्या पद्धतीने स्टाईल करू शकता. शरारावर कुर्तीऐवजी तुम्ही क्रॉप टॉप, जॅकेट किंवा साडी स्टाईल करू शकता; ज्यामध्ये तुम्ही सुंदर दिसाल.
साडी विद लाँग श्रग
श्रग नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. तुम्ही तो कुर्ती, प्लाझो, लाँग स्कर्ट किंवा साडीवरही घालू शकता. पण, सध्या सगळ्यात जास्त ट्रेंड आहे तो लाँग श्रग असलेली साडी. सुंदर श्रग घालून तुम्ही साडीतील तुमचे सौंदर्य अधिक आकर्षक करू शकता.
फ्युजन साड्या
फ्युजनच्या जादूने पारंपरिक साड्यांना आधुनिक टच देत एक वेगळी स्टाईल निर्माण केली आहे. सोप्या भाषेत फ्युजन म्हणजे मिसळणे. त्यामध्ये तुम्ही साडीच्या ब्लाऊजखाली जीन्स घालून साडी एका वेगळ्या प्रकारे नेसू शकता. किंवा साडीच्या टाईपनुसार तुम्ही ब्लाउजऐवजी शर्ट किंवा क्रॉप टॉप, असे प्रयोग तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता.
फ्लोअर-लेन्थ गाऊन
यंदाच्या दिवाळीत तुम्ही हलका किंवा पेस्टल रंगाचा गाऊन निवडू शकता. त्यावर तुम्ही श्रग घालू शकता किंवा ओढणीला वेगळ्या पद्धतीने स्टाईल करून वेगळा लूक देऊ शकता.