Happy Diwali 2024: सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीची जोरदार तयारी सुरू असून, घराची साफसफाई, डेकोरेशन, खरेदी करण्यात अनेक जण व्यग्र आहेत. बाजारातून मिठाई खरेदी करण्याकडेही अनेक जण पसंती देतात. दिवाळीच्या दिवसांत आजही अनेक घरांमध्ये घरच्या घरी विविध पदार्थ बनविले जातात. त्यात चकली, चिवडा, लाडू असे अनेक पदार्थ असतात. पण, गोड पदार्थांमधील साखर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यासाठी साखरेला पर्याय असलेल्या काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे मिठाई खाऊन तुमचे आरोग्यही चांगले राहील.
साखरेशिवाय मिठाई कशी बनवाल?
दिवाळीत घरी पाहुण्यांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत अनेक लोक असे घरी येतात; जे डाएटमुळे साखरेचे पदार्थ खात नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही साखरेऐवजी खालील काही पर्याय वापरू शकता.
- गुळापासून बनवा पौष्टिक मिठाई
गुळामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. तसेच तो आरोग्यासाठी चांगला मानला जातो. त्यामुळे गुळाचा वापर तुम्ही मिठाई बनविण्यासाठी करू शकता. शतकानुशतके भारतीय स्वयंपाकघरात गुळाचा वापर केला जात आहे, जो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. वास्तविक गुळात अनेक प्रकारची खनिजे आणि पोषक घटक असतात, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस आढळतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात.
- मध वापरा
दिवाळीत मिठाई बनविताना साखरेऐवजी मधाचा वापर करू शकता. हादेखील एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे. त्यामध्ये कॅल्शियम, पोटेशियम, कॉपर, मँगनीज, झिंक असे अनेक पोषक घटक आढळतात.
हेही वापरा: Diwali 2024 : दिवाळीआधी ‘या’ सोप्या पद्धतीने न थकता करा संपूर्ण घराची साफसफाई
- कोकोनट शुगर
मिठाईमध्ये टाकण्यासाठी कोकोनट शुगर हा एक चांगला पर्याय आहे. त्याला नैसर्गिक स्वीटनर, असेही म्हणतात; जे नारळाच्या झाडातून बाहेर पडणारे द्रव एकत्र करून तयार केले जाते. नेहमीच्या साखरेच्या तुलनेत नैसर्गिक स्वीटनरमुळे रक्तशर्करा कमी प्रमाणात वाढते.