भारतीय सणांमधील अतिशय लोकप्रिय सणांपैकी एक असलेला सण म्हणजे दिवाळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाला खूप महत्त्व आहे. यंदा २२ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. २२ तारखेला धनत्रोयदशी आहे. या दिवशी लक्ष्मी आणि कुबेरची पूजा केली जाते. तसेच, यावेळी घरगुती उपयोगाच्या वस्तु खरेदी करण्याचीही प्रथा आहे. धार्मिक मान्यतांनुसार, या दिवशी घर-वाहन, तसेच इतर काही खास वस्तूंची खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. यंदा धनत्रोयदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि योग्य विधी जाणून घेऊया.
धनत्रोयदशी मुहूर्त :
हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण त्रयोदशी तिथीची सुरुवात २२ ऑक्टोबर संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांनी होणार आहे. तर २३ ऑक्टोबरला रविवार ५ वाजून ४४ मिनिटांनी तिथी समाप्त होईल. उदय तिथीनुसार यंदा २३ ऑक्टोबरला धनत्रोयदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी वेगवेगळ्या आणि उपयुक्त वस्तु खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा २३ ऑक्टोबरला सूर्योदयापासून संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांपर्यंत अशा वस्तु खरेदी करण्याचा शुभ योग आहे. तर, या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त २३ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटे ते ६ वाजून ५ मिनिटांपर्यंत असेल.
धनत्रोयदशी पूजा विधी :
या दिवशी शुभ मुहूर्ताला घरामध्ये भगवान धन्वंतरी, कुबेर, देवी लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा प्रस्थापित करावी. यानंतर तुपाचा दिवा लावावा. देवाला फुले आणि फळे अर्पण करून पूजा सुरू करा. सोबतच मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
धनत्रोयदशीच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करणे शुभ ठरते?
- झाडू
झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी आवर्जून झाडू विकत घेतली जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी धनत्रोयदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून घरी आणणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील आर्थिक संकट दूर होते, असे मानले जाते.
- सोने-चांदी
या दिवशी आवर्जून सोने किंवा चांदी या मौल्यवान धातूंचे दागिने खरेदी केले जातात. त्याचबरोबर असेही मानले जाते की सोने-चांदी या धातूमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते.
- गोमती चक्र
बरेच लोक आरोग्य आणि समृद्धीसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवतात. असे केल्याने आपल्या धन-संपत्तीमध्ये वाढ होते, अशी धारणा आहे.
- भांडी
धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे. परंतु बहुतेकांना या दिवशी कोणती धातूची भांडी खरेदी करावी हे माहित नसते. जर तुम्हालाही अशी शंका असेल तर तुम्ही या दिवशी पितळेची भांडी खरेदी करू शकता. ही भांडी तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवा.
- उपयुक्त वस्तु
धनत्रयोदशीच्या तुम्ही कोणतीही उपयुक्त वस्तूची खरेदी करून शकता. यामध्ये पेनपासून वाहनापर्यंत तुम्ही कोणतीही वस्तु खरेदी करू शकता. खरेदीनंतर या वस्तूंची पूजा अवश्य करावी.
धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तूंची खरेदी ठरते अशुभ
धार्मिक मान्यतेनुसार, अशाही काही वस्तु आहेत ज्यांची खरेदी धनत्रयोदशीच्या दिवशी करू नये. यामध्ये प्लास्टिक, कात्री, सूरी किंवा पिन या गोष्टींचा समावेश आहे. तसेच या दिवशी अॅल्युमिनिअमची भांडी घेणे टाळावे. या धातूचा राहूसही संबंध असून ते अशुभ मानले जाते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)