Diwali Diva Money Saving Hack: दिव्यांचा सण दिवाळी आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आतापर्यंत तुमची दिवाळीची तयारी झालीही असेल पण मोठा सण म्हटला की आयत्या वेळी करावे लागणारे जुगाडाच सर्वात महत्त्वाचे ठरतात. तुम्ही यंदाच्या दिवाळीत दिव्यांनी तुमचं घर लख्ख उजळून टाकण्यासाठी आवडीने निरनिराळ्या पणत्या आणल्या असतील. विविध रंगांच्या, डिझाईनच्या, मण्या- मोत्यांनी सजलेल्या या पणत्या रांगोळीची शान वाढवतात. खिडकीत, दारामध्ये, बाल्कनीत सर्वत्र पणत्या लावण्याची आपलीही इच्छा असेल तर आजचे हे जुगाड तुमच्या खूपच कामी येऊ शकतात. दिव्यांनी घर उजळवताना येणाऱ्या दोन मोठ्या समस्या म्हणजे, एक तर महागडं तेल व इतकं महाग तेल पणत्यांमधून लीक होऊन पडणारे डाग. आज आपण या दोन्ही समस्यां सोडवायचा प्रयत्न करूया..
पणत्यांना लीक-प्रूफ कसे बनवाल? (How To Make Oil Diya Leak Proof)
१) सर्वात पहिला जुगाड म्हणजे आज पणती आणली, उद्या त्यात तेल वात टाकून पेटवली आणि सजवून ठेवली असं करू नका. जर तुम्ही साध्या मातीच्या पणत्या वापरणार असाल तर घरी आणल्यावर त्यांना वापरण्याआधी ५ ते ६ तास पाण्यात भिजवून ठेवा. मग पुढे आणखी दोन ते तीन तास या पणत्या कडक उन्हात वाळू द्या. आणि मग तुम्ही त्या वापरायला घ्या.
२) दुसरा महत्त्वाचा जुगाड म्हणजे तुम्ही पणत्या काही वेळा पहिल्या टीपनुसार तयार केल्या तरी त्यात लहानसे छिद्र राहण्याची शक्यता असतेच. अशावेळी ऍक्रेलिक पेंटचा एक हलका थर या पणत्यांना द्या. अगदी काही सेकंदात होणारे हे काम तुमचे खूप पैसे वाचवू शकते.
३) तुम्ही पणत्या जेव्हा सजवता तेव्हा त्याखाली एखादी लहानशी वाटी किंवा ताटली ठेवू शकता, यामुळे तेल जरी लीक झालेच तरी ते त्या वाटीत होईल. आता एवढ्या लहान लहान वाट्या कुठून आणायच्या असा प्रश्नही आहेच. अशावेळी आपण चक्क विड्याचं पण पणतीखाली ठेवू शकता, यामुळे सजावटीला सुद्धा सुंदर लूक येईल आणि तेलाच्या डागांची समस्या सुद्धा कमी होईल.
हे ही वाचा<< तुळशीचं रोप पाणी देऊनही सुकतंय? मातीत रोप लावताना ३० टक्के ‘ही’ गोष्ट मिसळा, लहान कुंडीतही येईल बहर
दरम्यान, अलीकडे अनेकजण अगोदरच रंगवलेल्या तसेच रंगीत खड्यांनी सजवलेल्या पणत्या वापरतात यामध्ये तेलाचा वापर करण्यापेक्षा मेणाचे लहान दिवे येतात त्यांचा वापर करणे अधिक फायद्याचे ठरू शकते. यामुळे तुमच्या महागड्या पणत्याही खराब होणार नाहीत आणि महाग तेलालाही चांगला पर्याय मिळेल. तुम्हाला हे जुगाड कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.