दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. त्यामुळे सध्या घरोघरी मस्त लाडू, चिवडा, चकली यांचा घमघमाट सुटला असले. मात्र, या सगळ्या फराळामध्ये बेसनाचे लाडू हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अनेकांच्या घरी बेसनाचे लाडू हे हमखास करण्यात येतात. यामध्ये काही जणींनी बेसनाचे लाडू करण्याची हौस असते. मात्र, लाडू करण्याची योग्य पद्धत माहित नसल्यामुळे अनेकदा हा लाडू करण्याचा बेत फसतो. त्यामुळेच बेसनाचे लाडू नेमके कसे करावेत याची कृती जाणून घेऊयात.
साहित्य-
किंचित जाडसर डाळीचे पीठ -अर्धा किलो
पिठीसाखर- अर्धा किलो
दूध – पाव वाटी
साजूक तूप
वेलदोडे पूड ( वेलची पूड)
काजू किंवा मणुका
कृती-
डाळीचं पीठ( बेसन) मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. हे पीठ भाजत असताना मध्ये मध्ये तूप सोडा. पीठ गुलाबी रंगाचं होईपर्यंत छान भाजून घ्या. मात्र, तूपाची मात्रा जास्त होणार नाही याची काळजी घ्या. ( तूप जास्त झालं तर लाडू बसण्याची किंवा चपटे होण्याची शक्यता असते.) त्यानंतर पीठ भाजून झाल्यावर एका परातीत थंड करण्यास ठेवा. पीठ थोडसं कोमट झालं की त्यात चवीनुसार पिठीसाखर घाला. पीठ आणि साखर नीट एकजीव करा. त्यानंतर त्यात थोडं-थोडं करुन दूध घाला आणि लाडू वळण्यास सुरुवात करा. लाडू वळत आल्यावर त्यावर आवडीनुसार मणुका किंवा काजू लावा.