म्हणता म्हणता यंदाची दिवाळी काही दिवसांवर आली आहे. प्रत्येक घरात साफसफाई, फराळाची तयारी, खरेदी अशी लगबग सुरू झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. पण, अशी तयारी आणि लगबग फक्त घराघरांतच नाही तर, बाहेर रस्त्यांवर, दुकानांमध्येसुद्धा बघायला मिळते. नवनवीन प्रकारच्या मिठाई, कपडे, फटाके, दिवे आणि आकाशकंदील यांनी रस्ते आणि सगळी दुकानं सजलेली आहेत. अशातच या वर्षी दिवाळीसाठी कोणता कंदील घरी आणायचा? घराची सजावट कशी करायची? या विचारात असाल, तर सजावटीचा हा भन्नाट व्हिडीओ खास तुमच्यासाठी आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा फक्त कंदील, पणत्या, रांगोळी आणि साध्या दिव्यांच्या माळा लावायचा तुमचा विचार असेल, तर जरा थांबा. @monicraftcreation या इन्स्टाग्राम हँडलने शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने दुकानातून आणलेल्या दिव्यांच्या साध्या माळांची, सुंदर सजावट करून त्यांना दिव्यांच्या मिनी कंदिलांप्रमाणे कसे लावू शकता हे दाखवलं आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी लावता त्या साध्या माळेऐवजी या वर्षी हे खास दिव्यांच्या माळेचे मिनी कंदील लावून पाहा. अशा दिव्यांच्या माळा सजवण्यासाठी घरात असणाऱ्या केवळ या तीन गोष्टींची आवश्यकता आहे. ती म्हणजे दोरा, डिंक/गम आणि फुगे. केवळ या गोष्टी तुमच्या दिवाळीची सजावट खुलवण्यासाठी मदत करू शकतात. दिव्यांच्या माळेसाठी हे छोटे छोटे कंदील कसे बनवायचे ते पाहू.
हेही वाचा : DIY: चेहऱ्यावरचं सौंदर्य खुलवतील हे १० घरगुती फेसपॅक; कसे बनवायचे पाहा
दिवाळीसाठी मिनी कंदील कसे बनवावेत?
१. हे मिनी कंदील बनवण्यासाठी आपल्याला हवे तेवढे फुगे फुगवून घ्यायचे आहेत. फुगवलेल्या फुग्यांचा आकार हा लहान असायला हवा.
२. आता सुईमध्ये शिवणकाम करताना वापरला जाणारा दोरा ओवून घ्या. ही धागा ओवलेली सुई डिंक/गमच्या डबीत एका बाजूने टोचून दुसऱ्या बाजूने बाहेर काढा. असं केल्यामुळे दोऱ्याला गरजेपेक्षा जास्त गम लागणार नाही आणि तुमचे हातदेखील चिकट होणार नाहीत.
३. आता हा डिंकात भिजलेला दोरा तुम्ही फुगवलेल्या फुग्याभोवती गुंडाळा. पण, दोरा गुंडाळताना दोऱ्यामध्ये खूप जास्त किंवा अगदीच कमी जागा राहत नाहीये ना याची काळजी घ्या. प्रत्येक फुग्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या रंगाचा दोरा घेऊ शकता.
४. सगळ्या फुग्यांभोवती दोरा गुंडाळल्यानंतर ते पंख्याखाली वाळण्यासाठी ठेवा.
५. सगळे फुगे वाळल्यानंतर त्या दोऱ्यांमध्ये गुंडाळलेल्या फुग्याचं टोक कात्रीनं कापून घ्या. फुग्यातील हवा काढून टाकल्यानंतर डिंक वाळून कडक झालेले दोरे त्याच आकारात राहतील. त्यामुळे त्यातील फुगा तुम्हाला सहज बाहेर काढता येईल.
६. सर्वांत शेवटी त्या सर्व दोऱ्यांनी तयार झालेल्या कंदिलांमधून दिव्यांची माळ ओवून घ्या.
आता तयार आहेत तुमचे, सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवलेले दिव्यांच्या माळेचे मिनी कंदील.
@monicraftcreation या इन्स्टाग्राम हँडलने या दिवाळीत दिव्यांच्या माळेसाठी बनवलेल्या या मिनी कंदिलाप्रमाणे अजूनही सजावटीचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.