देशाच्या प्रत्येक भागत, घराघरांत साजरी होणारी आणि सगळ्यांची आवडती दिवाळी ही आता काही दिवसांवर आली आहे. अशातच घरातले जुने कपडे, जुन्या वस्तू काढून टाकून घर स्वच्छ करण्यामागे सगळे लागलेले असतात. फराळाचा घमघमाट प्रत्येक स्वयंपाकघरातून येत असतो. यंदा कशा प्रकारे घर सजवायचं? घराला कोणत्या पद्धतीचा कंदील लावायचा? रांगोळी अशी काढायची? अशा प्रश्नांवर चर्चा आणि तयारी सुरू असते. या सर्व तयारी अन् सजावटीत एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे पणती किंवा दिवा. संपूर्ण घर जेव्हा दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघतं तेव्हा घर अगदी बघण्यासारखं असतं; नाही का?
मग या वर्षी थोड्या हटके पद्धतीने घराची सजावट करायचा तुमचादेखील विचार आहे का? मग @colours_creativity_space या इन्स्टाग्राम हँडलने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिवाळी सजावटीसाठी शेअर केलेला एक सुंदर व्हिडीओ नक्की पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही घरत असलेल्या खोक्यांच्या पुठ्ठ्यांपासून किंवा कार्डबोर्डपासून भिंतीला अतिशय सुंदर आणि फोटोजेनिक बनवू शकता.
घरातील भिंतीची सजावट कशी करावी?
साहित्य :
पुठ्ठा किंवा कार्डबोर्ड
सोनेरी लेस
सजावटीचे छोटे आरसे
मास्किंग टेप
दोन्ही बाजूंना गम असणारी डबल साईड टेप
एलईडीचे छोटे दिवे
रंग
गम/ डिंक
हेही वाचा : दिवाळी पार्टी दणक्यात साजरी करा! घरी पार्टी ठेवणार असाल तर या काही टिप्स उपयोगी पडतील…
कृती :
१. घरात नको असलेल्या पुठ्ठ्याचे किंवा कार्डबोर्डचे तुमच्या घराच्या भिंतीच्या आकारानुसार नऊ चौकोन कापून घ्या. प्रत्येक चौकोनाच्या आत अजून एक छोटा चौकोन पेनाने काढून तो ब्लेडने कापून, त्याची एक चौकाट तयार करा.
२. आता या चौकोनांना लाल, केशरी व हिरव्या रंगाने रंगवून घ्या. किंवा तुम्हाला आवडणाऱ्या रंगात रंगवा.
३. रंग वाळल्यानंतर गमच्या मदतीने पुठ्ठ्याच्या बाहेरच्या चौकोनाला चारही बाजूंनी सोनेरी लेस चिकटवा.
४. आता चौकोनाच्या आत तयार केलेल्या चौकटीला छोटे आरसे चिकटवा.
५. चौकोनाच्या तीन कोपऱ्यांत पांढऱ्या रंगाने चांदणीसारखी नाजूक नक्षी काढा.
६. एलईडीचे छोटे दिवे घेऊन त्यांनाही सोनेरी लेस किंवा सोनेरी रंगाची टेप लावा.
७. या दिव्यांच्या एका बाजूला डबल टेप चिकटवून, तो भाग चौकोनाच्या नक्षी नसलेल्या कोपऱ्यावर चिकटवा.
८. आता पुठ्ठ्याच्या मागच्या बाजूला मास्किंग टेप लावून, तयार चौकोन भिंतीवर एक एक करीत लावा.
९. दिव्यांच्या या सुंदर रचनेभोवती फुलांच्या माळा लावून आपल्या घरातल्या भिंतीची शोभा वाढवा.
@colours_creativity_space या इन्स्टाग्राम हँडलने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिवाळीच्या सजावटीचे अजूनही काही सुंदर सुंदर व्हिडिओ शेयर केले आहेत.