रोज किंवा काही खास दिवसांसाठी आपण मेकअप करत असताना, अगदी लहान लहान चुका नकळतपणे करत असून त्याकडे सहज दुर्लक्षदेखील करतो. परंतु, या लहान चुकाच मेकअप नेटका आणि सुंदर होण्यास अडथळा आणत असतात. चांगला मेकअप होण्यासाठी, तुमच्या त्वचेला साजेशा रंगाची मेकअप उत्पादने विकत घेणे आणि ती त्वचेवर व्यवस्थितपणे लावणे महत्त्वाचे असते. चांगला मेकअप कसा करायचा हे शिकण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. त्यामुळे योग्य रंगाची उत्पादने शोधणे आणि ती योग्य पद्धतीने त्वचेवर लावणे खूप महत्त्वाचे असते. ‘ब्युटी इन्फ्लुएन्सर’ तुम्हाला मेकअप कितीही सोप्या पद्धतीने करून दाखवत असतील, तरीही प्रत्येकाला ते करणे जमेलच असे नसते. त्यामुळे मेकअप करताना होणाऱ्या साध्या चुका टाळून, तुमच्या त्वचेच्या हिशोबाने चांगला आणि नेटका मेकअप कसा करावा याच्या टिप्स पाहा.

मेकअपमधील सामान्य चुका टाळण्यासाठी या टिप्स पाहा :

भारतातील ॲनेस्थेशिया बेव्हर्ली हिल्समधील, ब्रँड ट्रेनर नवीन भल्लाने लोकांच्या मेकअपमधील होणाऱ्या चुका आणि त्यांना कसे टाळता येऊ शकते याबद्दल काही टिप्स हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीत सांगितल्या आहेत.

१. कोरडी त्वचा

फाउंडेशन लावल्यानंतर त्वचा कोरडी पडणे हा चेहरा बराचवेळा धुतल्याचा परिणाम असू शकतो. त्यामुळे मेकअप सुरू करण्याआधी चेहरा नीट हायड्रेट करून घ्यावा. यामुळे मेकअपनंतर तुमचा चेहरा ताणल्यासारखा किंवा थकल्यासारखा दिसणार नाही.

हेही वाचा : काम करून डोळ्यांवर ताण आलाय? पाहा, निरोगी डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतील हे सात योगा…

२. नैसर्गिक प्रकाशाचा वापर

मेकअप केल्यानंतर तो तपासून बघताना कायम नैसर्गिक प्रकाशात तपासून पाहावा. रंगीत दिवे व इतर कोणत्याही रंगाच्या दिव्यांच्या प्रकाशात मेकअप पाहिल्याने, तुम्हाला त्याचा अचूक अंदाज येत नाही. त्यामुळे मेकअप खराब दिसू शकतो.

३. ‘ब्लेंडिंग’ महत्त्वाचे

मेकअप त्वचेवर समान आणि व्यवस्थित लागणे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी ‘मेकअप ब्लेंडिंग’ फार महत्त्वाचे असते. विशेषतः नॅचरल लुकसाठी मेकअप ब्लेंडिंग योग्य होणे फार गरजेचे असते अथवा मेकअप विचित्र होऊन तो खराब होण्याची शक्यता असते.

४. कन्सिलरचा वापर

कन्सिलरचा अति वापर केल्यास तुमचा चेहरा गरजेपेक्षा जास्त मोठा दिसतो किंवा तुम्ही विनाकारण प्रौढ दिसता. त्यामुळे कलर करेक्टर कन्सिलर योग्य प्रमाणात आपल्या डोळ्यांखाली लावल्याने तुमचा चेहरा नाजूक दिसण्यास मदत होते.

५. फाउंडेशनचा वापर

फाउंडेशनचा अति वापर टाळावा. फाउंडेशनचा थर लावण्याऐवजी ते चेहऱ्याच्या काही ठराविक भागांवर लावावे. नाक, गाल आणि डोळ्यांखाली फाउंडेशन लावून त्याला व्यवस्थित ब्लेंड करावे.

६. भुवयांचा आकार

भुवयांच्या आकारानेदेखील तुमचा चेहरा कसा दिसतो यावर परिणाम होत असतो. त्यामुळे भुवया अति जाड ठेवू नका किंवा त्यांना जास्त प्रमाणात आयब्रो पेन्सिलने कोरू नका.

७. मस्कारा लावणे

डोळ्यांच्या पापण्यांना मस्काराचे केवळ दोन कोट लावणे. गरजेपेक्षा अधिक कोट लावल्याने पापण्यांवर मस्काराचे थर जमा होतात. तसेच वरच्या पापण्यांसोबत डोळ्याखालील पापण्यांनादेखील मस्कारा लावावा. आपला मस्कारा दर तीन ते चार महिन्यांनी बदलावा.

हेही वाचा : शिकेकाई केसांना चमकवेलच; पण सोबत त्वचादेखील उजळेल. पाहा काय आहेत या टिप्स आणि ट्रिक्स….

८. पावडरचा वापर

पावडरच्या अति वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्या जास्त प्रमाणात दिसतात. त्यामुळे पावडर केवळ कपाळ आणि नाकावर लावावी.

९. लिपस्टिक

तुमच्या त्वचेला शोभतील अशा रंगाच्या लिपस्टिकची निवड करावी. प्रचंड गडद रंग ओठांना लावल्याने तुम्ही विनाकारण प्रौढ दिसू शकता. त्यामुळे त्वचेच्या रंगाजवळ जाणाऱ्या रंगाच्या लिपस्टिक्स निवडाव्यात. तरीही तुम्हाला गडद रंग ओठांना लावायचा असल्यास, चेहऱ्याचा मेकअप हा हलक्या रंगांनी करावा.

“बरेचजण आयशॅडो लावताना भरपूर चुका करत असतात. जसे की, भरमसाठ आयशॅडो लावणे किंवा एकमेकांवर वेगवेगळ्या रंगांच्या आयशॅडो लावणे. चुकीच्या रंगांच्या आयशॅडो डोळ्यांना लावणेदेखील मेकअप खराब दिसण्याचे एक कारण ठरू शकतात. शेवटी, चुकीच्या रंगाचे कन्सिलर वापरण्यानेदेखील मेकअप नेटका दिसत नाही. त्यामुळे आपल्या त्वचेच्या रंगाला साजेल अशा रंगाचे कन्सिलर घेणे हे फार महत्त्वाचे असते. कन्सिलरच्या योग्य वापराने तुमचा मेकअप नेटका दिसून, संपूर्ण मेकअप उठून दिसण्यास मदत होते”, असे मोईराच्या प्रशिक्षण प्रमुख, अवलिन बन्सल यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीत सांगितले आहे.