आपण बरेचदा आपल्या आहारात फ्रूट सॅलडचा समावेश करीत असतो. या फ्रूट सॅलडमधून विविध प्रकारच्या फळांचे एकाच वेळी सेवन केले जाते. हे सॅलड जरी पोटभरीचे असले तरी ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत चांगले किंवा योग्य असते हे तुम्हाला माहीत आहे का? “सर्व प्रकारची फळे एकत्र करून खाऊ नका,” असा सल्ला आयुर्वेद आणि निरोगी आतड्यांसाठीचे प्रशिक्षक [Ayurveda & Gut Health Coach] डॉक्टर डिंपल जांगडा यांनी आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिला आहे. आपल्या आहारात प्रथिने, कार्ब्स आणि भाज्यांचे जितके महत्त्व आहे तितकेच विविध फळांचे गुणधर्मसुद्धा शरीरासाठी उपयुक्त ठरत असतात. प्रथिने आपल्या स्नायू व हाडांची शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त असतात.त्यामुळे केसांची मुळेदेखील मजबूत राहतात. कार्ब्समुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. भाज्यांमध्ये असणारी खनिजे आणि प्रथिने शरीरासाठी आवश्यक असून, त्यातील फायबर्स तुमची पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे फळांचासुद्धा आपल्या शरीराला खूप फायदा होत असतो. परंतु, फळे एकत्र करून जे फ्रूट सॅलड आपण घेतो, त्याबाबत जाणून घेणेही आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रूट सॅलड खाणे आरोग्यासाठी चांगले असते का?

वेगवेगळी फळे एकत्र करून खाणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतु, त्यातही तुम्हाला काही गोष्टींचे भान ठेवावे लागेल. म्हणजे फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे तुम्ही फ्रूट सॅलडसाठी कोणत्या फळांची निवड करत आहेत यावर लक्ष ठेवा. योग्य फळांची निवड केल्याचा भरपूर फायदा असून, त्यांच्यातील पोषक घटकांची वाढ होण्यास विशेष मदत होते. फळांचे विविध प्रकार, चव, गुणधर्म इत्यादींचा विचार करून जर त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या आहारात केलात, तर शरीराला अतिशय उत्तम प्रकारे पोषण मिळण्यास आणि त्यासोबतच पचनक्रियासुद्धा सुधारून, आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
चांगले फ्रूट सॅलड बनवण्यासाठी, त्यात कोणकोणत्या फळांचा वापर करून चालणार नाही ते माहीत असायला हवे.

हेही वाचा : हिवाळ्यात सतत आळस येतोय? ‘हे’ असू शकतं कारण; पाहा या ५ रेसिपी ठेवतील तुम्हाला उत्साही…

फ्रूट सॅलूड बनवताना कोणत्या फळांचा वापर करावा आणि करू नये?

आंबट फळे

लिंबू हा शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करतो हे आपल्याला माहीत आहे. पण असे का? कारण- लिंबात असणारा आंबटपणा, त्यातील सायट्रिक अॅसिड हे आपले शरीर आतून स्वच्छ करते आणि शरीरातील नको असलेले घटक, अतिरिक्त चरबी घालवण्यास मदत करते. म्हणूनच बरेच जण सकाळी उठल्यावर गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून, त्याचे सेवन करतात. त्याचप्रमाणे काहीशी आंबट गुणधर्म असणारी फळे काम करतात, असे डॉक्टर डिंपल यांचे म्हणणे आहे. आंबट फळे- उदा. संत्री, टँजेरिन [संत्र्यासारखे एक फळ], अननस, द्राक्षे, किवी, हिरवे सफरचंद इत्यादी.

तुरट फळे

तुरट फळे तुमच्या शरीरातील पाणी धरून ठेवण्याचे प्रमाण कमी करून, त्वचा तुकतुकीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे ही तुरट फळे इतर फळांसोबत एकत्र करून खाल्ली जाऊ शकतात, असे डॉक्टर डिंपल म्हणतात. तुरट फळे- उदा. सफरचंद, डाळिंब, ब्ल्यू बेरी, पेरू, स्ट्रॉबेरी, आवळा इत्यादी.

गोड फळे

गोड फळांची यादी खूपच मोठी असून, या फळांच्या सेवनाने शरीराला उपयुक्त असणारे फॅट्स मिळण्यास मदत होते. सोबतच नवीन उती निर्माण करण्यासाठीही या प्रकारची फळे मदत करतात. म्हणून अशा फळांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. गोड फळे- उदा. आंबा, केळी, पपई, कलिंगड, पीच, अवकॅडो, अंजीर इत्यादी.

फ्रुट सॅलेड खाण्याची उत्तम पद्धत कोणती?

विविध फळांचे विविध गुणधर्म आणि प्रकार असतात. वर पाहिले त्याप्रमाणे आंबट, गोड, तुरट या प्रकारांत फळांचे विभाजन केले गेलेले आहे. त्यामुळे फ्रूट सॅलड बनवताना ठरावीक प्रकारातील फळांचीच निवड करावी. म्हणजे सॅलड बनवताना केवळ गोड फळांचे फ्रूट सॅलड किंवा केवळ आंबट फळांचे फ्रूट सॅलड तयार करावे. जर फळांचे त्याच्या प्रकारानुसार विभाजन करता येत नसेल, तर सर्वांत सोपा उपाय करा आणि तो म्हणजे एका वेळी एकाच फळाचे सेवन करावे. त्यामळे तुमच्या शरीराला त्या त्या वेळी त्या त्या फळातून मिळणारे घटक शोषून घेण्यास सोपे होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not add all fruits to your fruit salad learn the right way of making healthy fruit salad use this tips dha
Show comments