How to store onions and potatoes: कांदे आणि बटाट्यांचा वापर भारतातील घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. हे दोन्ही पदार्थ विविध पदार्थांमध्ये वापरले जातात. त्यामुळे अनेक पदार्थ बनवण्यासाठी ते उपयुक्त आहेत. त्याशिवाय कांदा, बटाटा, लसूण हे अनेक दिवस खराब होत नाहीत आणि त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये या तीन वस्तू एखाद्या कोपऱ्यामध्ये साठवून ठेवल्या जातात. कधी कधी कांदा आणि बटाटा एकत्रच ठेवला जातो. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का? कांदा आणि बटाटा कधी एकाच ठिकाणी एकत्र ठेवणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

कांदे आणि बटाटे एकत्र का ठेवू नयेत?

खरे तर, कांदे इथिलीन वायू तयार करतात आणि उत्सर्जित करतात. त्यामुळे पिकण्याची प्रक्रिया वेगवान होते. परिणामत: कांद्यांच्या जवळपास ठेवलेले बटाटे कुजतात आणि लवकर खराब होतात. हा वायू बटाट्यामध्ये अंकुर येण्याची प्रक्रियादेखील वेगाने करतो. बटाट्याच्या अंकुरांमध्ये ग्लायकोआल्कलॉइड्सचे प्रमाण जास्त असल्याने ते विषारी मानले जातात, ज्याचा मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.

बटाटे कुठे ठेवायला हवेत?

बटाटे भाजी ठेवण्याच्या जाळीमध्ये किंवा घरातील कोपऱ्यात साठवले पाहिजेत. ही ठिकाणे अंधारी, थंड व कोरडी असते आणि त्यामुळे हे ठिकाण बटाटे साठवण्यासाठी सर्वांत योग्य मानले जाते. त्यांना खोलीच्या तापमानापेक्षा कमी आणि रेफ्रिजरेटरच्या तापमानापेक्षा जास्त तापमानात साठवणे आवश्यक आहे.