केसांची देखभाल आणि त्यांना रुक्ष होण्यापासून वाचवण्यासाठी केसांना नियमितपणे तेल लावणे अत्यंत आवश्यक असते. तुम्ही तुमच्या केसांच्या संरचनेनुसार कोणतेही योग्य तेल लावू शकता. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. यामुळे बरेचजण केसांना गरम तेल लावणे पसंत करतात. असे मानले जाते की गरम तेल लावल्याने केसातील कोंडा दूर होतो. तर काही जणांचे म्हणणे असे आहे की केसांमध्ये गरम तेल लावल्याने केस लवकर सफेद होतात. अशा परिस्थितीत केसांची निगा राखण्यासाठी केसांना तेल लावण्याचा योग्य मार्ग कोणता हे तुम्हाला निवडता येत नसेल तर आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
थंडीमध्ये केसांसाठी कोमट तेल ठरते फायदेशीर
थंडीच्या दिवसांमध्ये केसांसाठी गरम किंवा थंड असे दोन्ही तेल निष्फळ ठरतात. अशावेळी केसांसाठी कोमट तेलाचा वापर करावा. तुम्ही तेल हलकेसे गरम केले तर त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होत नाहीत. तसेच असे तेल लावल्याने केसांची वाढ देखील होते.
गरम तेलाचा वापर केल्याने केस होऊ शकतात कमकुवत
गरम तेल केसांच्या मुळांना कमकुवत करते. जर तुम्ही केसांसाठी जास्त गरम तेलाचा वापर करत असाल तर त्यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात. सोबतच केस गळणे आणि केस सफेद होणे यासारख्या समस्या वाढू शकतात.
टाळूवर होऊ शकतो वाईट परिणाम
जर तुमचे केस तेलकट असतील तर कधीही केसांसाठी जास्त गरम तेलाचा वापर करू नये. त्यामुळे डोक्याला खाज येणे आणि कोंड्याची समस्या देखील होऊ शकते. तसेच टाळूवरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
अॅलर्जी असल्यास गरम तेल लावू नका
प्रत्येकाला वेगवेगळ्या वस्तूंची अॅलर्जी असते. अशात कोणतेही गरम तेल वापरण्याआधी ते तपासून पाहावे. जर ते लावल्यानंतर तुम्हाला खाज सुटणे, जळजळ होणे किंवा फोड येणे अशा समस्या सुरू झाल्या तर समजून जा की तुम्हाला या तेलाची अॅलर्जी आहे. अशा परिस्थितीत तेल गरम करण्याऐवजी ते सामान्यपणे लावा. जेणेकरून ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.
या पद्धतीने तेल लावल्यास होईल जास्त फायदा
रात्री कोमट तेल लावल्याने जास्त फायदा होतो. जर तुम्ही रात्री तेल लावू शकत नसाल तर सकाळी केस धुण्याच्या १, २ तास आधी लावा. त्यामुळे केसांना अधिक ताकद मिळते. एका वेळी वापरता येईल एवढेच तेल गरम करा. कारण उरलेले तेल वारंवार गरम केल्याने केसांचे नुकसान होते.
(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया हे उपाय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)