Poha is not healthy : सकाळी नाश्त्यात काय खायला आवडते, असा जर प्रश्न विचारला, तर आपल्यापैकी अनेक जण पोहे असे उत्तर देतील; पण नाश्त्यात पोहे खावेत का? हे बनवायला सोपे आणि चवीला तितकेच स्वादिष्ट असतात. पण मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या कार्यकारी अध्यक्षा व संचालक अमीरा शाह सांगतात की पोहे हे आरोग्यासाठी चांगले नाही. फिगरिंग आउट विथ राज शमानी याच्ंया एका एपिसोडमध्ये त्यांनी पोहे आरोग्यदायी नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

पोहे तांदळापासून बनवले जातात.

पोह्यांमध्ये ग्लुटेन नसते. पोहे हे तांदळापासून बनवले जात असल्याने शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अमीरा सांगतात, “तुम्हाला माहीत आहे का पोहे हा भारतातील एक अतिशय आरोग्यदायी नाश्ता मानला जातो, असे का? हे मला कधीच समजले नाही. पोहे हे तांदळापासून बनवले जातात; मग ते आरोग्यासाठी चांगले कसे? ते पूर्णत: तांदूळ आहे. तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. आपल्याला आवश्यक ऊर्जा देण्यासाठी आपले शरीर कार्ब्सचे रक्तातील साखरेमध्ये रूपांतर करतात.

त्या पुढे सांगतात, “जेव्हा तुम्ही नाश्त्यात पोहे खाता, दुपारच्या जेवणात डाळ भात खाता, संध्याकाळी समोसा किंवा वडा पाव खाता आणि रात्री पुन्हा भात किंवा पास्ता वगैरे खाता, तेव्हा त्यात फक्त कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढते, जे शरीराच्या आरोग्यासाठी चांगले नाही.

टिप्स

जर तुम्ही पोहे खाणे सोडू शकत नसाल, तर त्यात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. कमीत कमी तेलाचा वापर करून पौष्टिक पदार्थांपासून पोहे बनवण्याचा प्रयत्न करा. बिग बॉस १३ ची स्पर्धक व अभिनेत्री शहनाज गिलसुद्धा असाच पौष्टिक पोह्यांचा नाश्ता करते. २५ जानेवारी २०२५ रोजी टाइम्स फूडीला दिलेल्या मुलाखतीत तिने पौष्टिक पोहे कसे बनवावेत, याविषयी सांगितले होते.

शहनाजने सांगितले होते की, ती तिच्या दिवसाची सुरुवात प्रोटीनयुक्त नाश्त्याने करते, ज्यामध्ये जास्तीत जास्त भाजीचा समावेश करून ती पोहे बनवते. ती सांगते की, तिची पोह्याची रेसिपी थोडी वेगळी आहे. कारण- ती पोह्यांपेक्षा जास्त त्यात भाज्यांचा समावेश करते. तसेच पोह्यांबरोबर ग्रॅनोला व दही खाते.