हे माझ्या सोबत असं आधी सुद्धा घडलंय.. तुम्हाला कधी काही प्रसंगांविषयी असं वाटलंय का? अशीच परिस्थिती, हीच लोकं, हीच वेळ, हीच कृती सगळं सारखंच तुम्ही यापूर्वी सुद्धा अनुभवलाय असा भास तुम्हाला होतो? हे अनैसर्गिक नसून काही प्रसंगी, तुमच्या मेंदू व मनाची एक सामान्य प्रतिक्रिया आहे. या प्रतिक्रियेला शास्त्रीय भाषेत देजा वू (Deja Vu) असे म्हणतात. पण असं नेमकं का होतं हे आज आपण जाणून घेणार आहोत.
देजा वू हा एक फ्रेंच शब्द असून याचा अर्थ आधीच पाहिलेय असा होतो. एखादी घटना आपण पहिल्यांदाच पाहतो मात्र आपला मेंदू आपल्याला ही घटना पूर्वी पाहिल्याचे जाणवून देतो म्हणजेच आपल्याला देजा वू होतो.
देजा वू होण्यामागे खरे कारण काय?
- स्मरणशक्तीचे खेळ
आपल्या मेमरीचे दोन भाग असतात. एक कॉन्शियस व एक सब कॉन्शियस, आपल्याला देजा वू होतो तेव्हा त्या प्रसंगाशी मिळती जुळती एखादी आठवण तुमच्या सब कॉन्शियस मेमरीत जागी होते. याला क्रिप्टोमेन्सिया असेही म्हणतात, यात आपल्याला आपण हा प्रसंग नेमका कधी व कुठे अनुभवला हे आठवत नाही पण हा प्रसंग कधीतरी घडलाय हे जाणवते. जर आपल्याला एखादा अपघात झाला असेल तर मेंदू मधील काही तंतूचा गुंता होऊन आपल्या आठवणी एकमेकात अडकतात व आपल्याला वारंवार गोष्टी विसरणं किंवा देजा वू चे अनुभव येऊ शकतात.
- कॉमन घटक
एखाद्या परिस्थितीतील काही घटक कॉमन असतात. उदाहरणार्थ तुम्ही बाहेर फिरायला गेला आहात, यावेळी तुमच्या सोबत असणारे मित्र तेच आहेत. तुम्ही ज्याठिकाणी गेला आहेत त्या ठिकाणी एखादा दरवाजा, एखादा रंग किंवा असा कोणताही एक किंवा अधिक घटक कॉमन दिसला तर तुम्हाला सबकॉन्शियस मध्ये तशीच आठवण पुन्हा जागी होते.
यामध्ये सेट अप सुद्धा महत्त्वाचे योगदान देते. तुम्ही पहिल्याला एखाद्या प्रसंगात घटक कॉमन असू शकतात पण ते अगदी तंतोतंत जुळतीलच असे नाही. म्हणजे समजा एखादं झाड आहे तर ते झाड अमुक कोणते असणे गरजेचे नाही पण ते झाड असणे तुम्हाला देजा वू भासवून देते.
- स्वप्न
काही वेळेला तुमच्या डोक्यात एखादी परिस्थिती सुरु असते, ज्यावर आधारित एखाद्या सेट अप मध्ये आपल्याला स्वप्न दिसतात. जेव्हा या स्वप्नांशी मिळती जुळती घटना घडते तेव्हा तुम्हाला तोच प्रसंग यापूर्वी सुद्धा पाहिल्याचे भासते.
गंमत म्हणजे देजा वू हा केवळ तुम्ही कोणती गोष्ट पाहता यावर अवलंबून नसतो. उलट तुम्हाला एखादी गोष्ट जाणवणे, ऐकू येणे अशाही सेन्सेशन मध्ये देजा वू होऊ शकतो. तुमचे इंद्रिय जितके संवेदनशील तितके तुम्हाला देजा वू होण्याची प्रक्रिया अधिक होते.