ऑटोमोबाईल हे एक अतिशय मोठे क्षेत्र आहे. देशात दिवसागणिक असंख्य वाहने रस्त्यावर अतिशय दिमाखात दाखल होत असतात. आपल्याकडे चारचाकी असावी असे जवळपास सगळ्यांनाच वाटत असते. पण कधी परवडत नाही म्हणून तर कधी त्याहून महत्त्वाचे इतर प्राधान्य असल्याने कार घेणे मागे राहून जाते. भारतात गरज म्हणून कार घेणारा आणि केवळ स्टेटस सांभाळण्यासाठी कार घेणारा असे दोन वर्ग आपल्याला पहायला मिळतात. मोठमोठ्या कार कंपन्या ग्राहकांचा प्रवास जास्तीत जास्त चांगला व्हावा यासाठी कायम प्रयत्नशील असतात. त्यासाठी अधिकाधिक सोयींनी युक्त आणि महागड्आ कार तयार करण्याचे काम या कंपन्यांमार्फत केले जाते. पाहूया २०१७ मध्ये अशा कोणत्या महागड्या कार रस्त्यावर दाखल झाल्या आहेत.
Lamborghini Aventador S Roadster (लम्बोर्घिनी अॅडव्हेंटाडोर एस रोडस्टर)
ही इटालियन कंपनीची कार भारतात दाखल झाली आहे. याची किंमत ऐकून सामान्य माणूस नक्कीच थक्क होईल, ती आहे ५ कोटी ७९ लाख इतकी आहे. या गाडीला दोनच पॅनेल असून मॅट कार्बन आणि फायबरमध्ये याचे रुफ तयार करण्यात आले आहे, त्यामुळे त्याचे वजनही अतिशय कमी म्हणजे १२ किलो इकतेच आहे. ही स्पोर्ट्सकार इतकी वेगवान आहे की ती ० ते १०० वेगासाठी ३ सेकंद इतका कमी वेळ घेते.
Ferrari GTC4 Lusso and GTC4 Lusso T ( फेरारी जीटीसी ४ लूसो आणि जीटीसी ४ लूसो टी)
या दोन्हीही इटालियन कंपनीच्या स्पोर्टस कार आहेत. यातील GTC4 Lusso T ही गाडी भारतात ५ कोटी २ लाख रुपयांना तर GTC4 Lusso ही गाडी ४ कोटी २ लाखांना खरेदी करता येते. या गाड्यांचे इंजिन ६२६२ सीसीचे असून ती घोड्याच्या वेगाने धावते. ३.४ सेकंदामध्ये ही गाडी ताशी १०० किलोमीटर या वेगाने धावते. याचा सर्वाधिक वेग ३३५ ताशी किलोमीटर आहे.
Range Rover SVAutobiography Bespoke ( रेंज रोव्हर एसव्हीऑटोबायोग्राफी बेसपोक)
ही गाडी ब्रिटीश बनावटीची असून भारतात ती २ कोटी ८ लाखांना उपलब्ध आहे. यामध्ये ४.४ लीटरचे डिझेल इंजिन आहे जे ३४० इतकी पॉवर देते. त्याचबरोबर ५ लीटरचे पेट्रोल इंजिन आहे जे ५५० पॉवर देते. विशेष म्हणजे कंपनीने या गाडीची केवळ ५ मॉडेल विक्रीसाठी भारतात उपलब्ध केली आहेत.
Jaguar F-Type SVR (जॅग्वार एफ-टाइप एसव्हीआर)
यामध्ये दोन लोक बसू शकतील आणि ४ जण बसू शकतील असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. यातील पहिल्या प्रकाराची किंमत २ कोटी ४८ लाख इतकी असून दुसऱ्या प्रकाराची किंमत २ कोटी ६२ लाख इतकी आहे. कंपनीने आतारपर्यंत तयार केलेल्या कारपैकी SVR या सर्वाधिक पॉवरच्या कार आहेत. यामध्ये ५ लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले असून याचा वेग ताशी ३२२ पर्यंत जाऊ शकतो.