चहाला नाही म्हणायचं नाही, हा चहाप्रेमींचा अघोषित नियम आहे. तशीच अनेकांना कॉफी प्रिय असते. म्हणूनच दिवसभरातील या चहा-कॉफीच्या वेळा अगदी स्पेशल असतात. त्यानिमित्ताने छोटा ब्रेक मिळतो, थोड्या गप्पा होतात आणि आपण रिलॅक्स होतो. विशेष म्हणजे संध्याकाळच्या वेळी. पण अनेकांना यावेळी नुसता चहा किंवा नुसती कॉफी चालत नाही. चहा-कॉफीच्या वाफाळलेल्या कपसोबत बिस्किट्स, कुकीज, फरसाण, चिवडा असं बरंच काही लागतंच. पण आपल्याला खरंच यावेळी भूक लागलेली असते का? मुख्य म्हणजे हा स्नॅक्स शरीरासाठी खरंच पोषक किंवा आवश्यक असतो का? असे प्रश्न तुम्हाला कधी पडतात का? चला तर आज याच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
फूड थेरपिस्ट डॉ. रिया बॅनर्जी अंकोला यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर चहाच्या वेळेदरम्यान घेतल्या जाणाऱ्या स्नॅक्समुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉ. रिया बॅनर्जी म्हणतात की, “अनेकदा लोकांना भूक लागलेली नसते. परंतु तरीही ते स्नॅक्स खातात. वजन वाढण्याचं हे एक प्रमुख कारण आहे.” डॉ. रिया बॅनर्जी पुढे असं स्पष्ट नमूद करतात कि, “तुम्हाला खरोखरच प्रत्येकवेळी चहा-कॉफीसह नाश्ता किंवा स्नॅक्स घेण्याची गरज नसते. त्यामुळे, तुम्हाला खरंच भूक लागली असेल तरच स्नॅक्स घ्या. अन्यथा अनावश्यक खाण्यापासून तुमच्या पचनप्रक्रियेला थोडा आराम द्या.”
View this post on Instagram
चहा-कॉफीसोबत अनावश्यक स्नॅक्स घेणं कसं टाळाल?
डॉ. रिया बॅनर्जी यांच्या मते, “आपलं जेवण व्यवस्थित, पोटभर असावं. माणसाचं शरीर हे दिवसभर सक्रीय राहण्यासाठी, भूक लागल्यावर उत्तम जेवण जेवण्यासाठी आणि थकल्यानंतर विश्रांतीसाठी डिझाईन केलेलं आहे. हे इतकं सोपं आहे.” डॉ. रिया यावेळी असंही म्हणाल्या कि, “मी देखील स्नॅक्स घेते, पण दररोज नाही.”
काय टाळावं?
डॉ. रिया बॅनर्जी सांगतात कि, “सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम ४-५ बदाम खाऊ शकता. त्यानंतर तुम्ही तुमचा पहिला चहा किंवा कॉफी घ्या म्हणजे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होणार नाही. तसंच तुम्ही जरी अगदी फिट असाल तरीही खरंच तुम्हाला त्याबरोबर प्रोसेस्ड कुकीज किंवा अन्य पदार्थ खाण्याची बिलकुल आवश्यकता नाही.”