उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना पोटाच्या संबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गर्मीमुळे जेवण नीट पचत नाही आणि पोटासंबंधी तक्रारी समोर येतात. काही लोकांना तर उन्हाळ्याच्या दिवसात उलटी आणि जुलाब याचा त्रास होतो. कडक उन्हाळ्यामुळे लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात. यावेळी अॅसिडिटीची समस्या सर्वाधिक सतावते.
उन्हाळ्यात बहुतांश लोकांना अपचनाच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. उन्हाळ्यात काही गोष्टींचे सेवन केल्यास अॅसिडिटीची समस्या कमी होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या खास गोष्टी.
नारळपाणी :
उन्हाळ्यात नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने अॅसिडिटीची समस्या कमी होऊ शकते. नारळाच्या पाण्यामध्ये डिटॉक्सिफाईंग गुणधर्म असतात. नारळाच्या पाण्यात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, जे पोटाच्या समस्या दूर ठेवते. तसेच नारळ पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता होत नाही.
थंड दूध :
अॅसिडिटीचा सामना करण्यासाठी थंड दूध हा एक उत्तम उपाय आहे. थंड दूध पोटातील अॅसिड शोषून घेते. यामुळे छातीत जळजळ किंवा चिडचिड होत नाही. उन्हाळ्यात, जेव्हा जेव्हा तुम्हाला पोटात अॅसिड तयार होणे किंवा छातीत जळजळ यासारखी समस्या जाणवते तेव्हा एक ग्लास साधे थंड दूध प्या.
ताक :
थंड दुधाशिवाय उन्हाळ्यात ताक पिऊनही अॅसिडिटीपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात ताक पोट थंड ठेवते आणि त्यात असलेले नैसर्गिक बॅक्टेरिया पोटात जास्त प्रमाणात अॅसिड तयार होण्यास प्रतिबंध करतात. तर दुसरीकडे ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. उन्हाळ्यात जेवणानंतर ताकाचे नियमित सेवन करा, त्यामुळे अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळेल.
Heat Wave चा सामना करण्यासाठी उन्हाळ्यात दररोज प्या नारळपाणी; शरीराला होतील ‘हे’ फायदे
खरबूज :
खरबूजमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर अॅसिड रिफ्लक्स आणि पोटाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. खरबूज पोटाला थंड ठेवते आणि त्यात असलेले पाणी शरीराला हायड्रेट करण्यास आणि पीएच पातळी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे अॅसिडिटी टाळण्यास मदत होते.
केळी :
केळी खाल्ल्याने अॅसिडिटीपासून बऱ्याच अंशी सुटका मिळते. उन्हाळ्यात दिवसातून एक केळं नक्की खा आणि पोटाच्या समस्या दूर ठेवा. केळीमध्ये असलेले पोटॅशियम पोटात अतिरिक्त अॅसिडिटी तयार होण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे शरीराची पीएच पातळी कमी होते. याशिवाय केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. उन्हाळ्यात पिकलेली केळी खाल्ल्याने अॅसिडिटी दूर राहते.
(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.)