डार्क मोडच्या वापराने बॅटरी सेव्ह होते असं तुम्हालाही वाटतं ना? पण हे पूर्णपणे सत्य नाही. एका नव्या अभ्यासातून याबाबत काही आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. डार्क मोड हा एक मोठा बॅटरी सेव्हर असल्याचं म्हणत स्मार्टफोन इकोसिस्टम त्याला वेगानं स्वीकारत आहे. मग अँड्रॉइड असो किंवा आयओएस, आपल्या अलीकडच्या काळात युझर्सना पर्याय देणारे अधिकाधिक अॅप्स दिसतात. मात्र, एका नवीन अभ्यासाने बॅटरी सेव्ह करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून डार्क मोडचा वापर करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एका नवीन अभ्यासात पर्ड्यू युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या टीमने स्मार्टफोनच्या बॅटरीवर डार्क मोडचे होणारे परिणाम तपासण्यासाठी नवीन तंत्र विकसित केलं आहे. यामुळे आता डार्क मोडच्या तुलनेत स्क्रीनवरील हलक्या रंगांमुळे होणाऱ्या बॅटरी ड्रेनचे प्रभावी निरीक्षण करण्यास मदत होईल.
डार्क मोड किती बॅटरी वाचवू शकतो?
आश्चर्यकारकपणे या अभ्यासाचे निष्कर्ष असं सुचवतात की डार्क मोड हा स्मार्टफोनच्या बॅटरी आयुष्यावर लक्षणीय परिणाम करण्याची शक्यता नाही. कारण, नेहमीच्या हलक्या रंगाच्या थीमपेक्षा डार्क मोड हा जरी कमी बॅटरी वापरत असला तरीही “बहुतेक लोक ज्या पद्धतीने दररोज फोनचा वापर करतात” ते लक्षात घेता हा यांतील फरक काही लक्षणीय नाही. आकड्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, OLED स्मार्टफोनवरील डार्क मोड हा नॉर्मल मोडच्या तुलनेत केवळ ३ ते ९ टक्के वीज वाचवू शकला. परंतु, हा निष्कर्ष फोनचा ब्राईटनेस ३० ते ५० टक्के ब्राइटनेस असतानाचा आहे.
नवीन अभ्यासामध्ये असं म्हटलं आहे कि, फोन डिस्प्लेच्या १०० टक्के ब्राइटनेस असताना या बॅटरीचे फायदे खूप जास्त असू शकतात. एखादा स्मार्टफोन हा डार्क मोडवर चालवल्यास जास्तीत जास्त ब्राइटनेसमध्ये सुमारे ३९ ते ४७ टक्के बॅटरीची बचत होऊ शकते. त्यामुळे, असं आढळून आलं आहे की डार्क मोड बॅटरीचे आयुष्य पीक ब्राइटनेसमध्ये लक्षणीयरीत्या वाचवू शकतो
डार्क मोड संशोधन
डार्क मोडबाबतच्या अभ्यासासाठी पर्ड्यू युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी गुगल प्ले, गूगल न्युज, गुगल फोन, गुगल कॅलेंडर, यूट्यूब आणि कॅल्क्युलेटर या सर्वाधिक डाउनलोड केल्या जाणाऱ्या ६ अॅप्सची चाचणी केली. यावेळी पिक्सेल २, मोटो झेड ३, पिक्सेल ४ आणि पिक्सेल ५ यासह स्मार्टफोनवर ६० सेकंदांच्या अॅक्टिव्हिटीसाठी डार्क मोडवर अॅप्सची चाचणी घेण्यात आली.
दरम्यान जरी या चाचण्या अँड्रॉइड अॅप्स आणि फोनवर घेण्यात आल्या असल्या तरी, शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की हे निष्कर्ष ओएलईडी स्क्रीनसह आयफोनसाठी देखील योग्यच असण्याची शक्यता आहे. यावेळी या टीमने चाचणीसाठी नवीन पॉवर मॉडेलिंग तंत्र तयार केलं जे आता पेटंटच्या प्रतीक्षेत आहे.
असा दावा करण्यात आला आहे कि, हे नवीन तंत्र विद्यमान तंत्रज्ञानापेक्षा अधिक अचूकपणे OLED फोन डिस्प्लेचे पॉवर ड्रॉ निर्धारित करण्यात सक्षम आहे. याच कारण असं की हे नवीन तंत्र बॅटरी लाईफवर डार्क मोडच्या होणाऱ्या परिणामांचं मोजमाप करतं