Does Morning Coffee Cause Acidity: जोपर्यंत मी माझी सकाळची कॉफी पित नाही माझ्याशी बोलू नका, असा एक डायलॉग कधी सिनेमात, वेब सीरिजमध्ये, कधी कधी तर एखाद्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या भावातूनही आपण ऐकला, पाहिला असेल. अनेकांना सकाळचा कॉफीचा एक घोट दिवसभरासाठी प्रसन्न राहण्याचा डोस वाटतो आणि खरं सांगायचं तर ही कॉफी आपल्या अत्यंत मोहक सुगंधाने, किंचित कडू व गोड चवीने आपल्याला सकाळी तो ‘ऊर्जेचा बूस्ट’ देत असेलही, पण सकाळ उलटून सूर्य जरा डोक्यावर येऊ लागला की आपोआपच गळ्याशी आंबट पाणी होऊ लागतं,(वैद्यकीय भाषेत यालाच ॲसिडिटी म्हणतात.) अस्वस्थ वाटू लागतं, करपट ढेकर येऊन आणखीनच ‘कसंतरी’ होऊ लागतं. असं होताच, सकाळी तर मूड चांगला होता, अचानक काय झालं? असा प्रश्न तुम्हाला आणि तुमच्या चिडचिडीला सहन करणाऱ्यांना पडू शकतो; पण त्याचं उत्तर हे सकाळची ‘कॉफी’ असू शकतं. अनेकदा सकाळी उपाशी पोटी कॉफी प्यायल्याने ॲसिडिटी वाढण्याची शक्यता असते. याबाबत सध्या सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. म्हणूनच आज आपण ‘ॲसिडिटीसाठी कॉफी जबाबदार आहे का’, या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोषणतज्ज्ञ राल्सटन डिसुझा (Ralston D’Souza) यांनी थेट या प्रश्नाचं उत्तर देत कॉफीला ॲसिडिटीचा दोष देण्याचं कारण नाही असं म्हटलं आहे. डिसुझा म्हणतात की, सामान्यतः कॉफीमधील कॅफिन आणि क्लोरेजेनिक ॲसिडसारखे घटक हे पोटात ॲसिडचे प्रमाण वाढवू शकतात, ज्यामुळे काहीवेळा ॲसिड रिफ्लक्स, मळमळ, अपचन, छातीत जळजळ असे परिणाम दिसून येऊ शकतात. पण, यात एक बाब महत्त्वाची आहे, ती म्हणजे ‘प्रमाण.’ तुम्ही किती प्रमाणात कॉफी पिता यावरसुद्धा परिणाम अवलंबून असतात. यात काहींना असं वाटतं की, जेव्हा आपण उपाशी पोटी कॉफी पितो तेव्हा कॉफीतील ॲसिड पातळ करण्यासाठी पोटात अन्न नसल्याने त्रास वाढू शकतो. पण, डिसुझा यांनी सांगितल्याप्रमाणे असं ठोसपणे सांगता येईल यासाठी पुरावे मात्र मर्यादित आहेत. प्रत्येकालाच उपाशी पोटी कॉफी प्यायल्यावर त्रास होईलच असे नाही. ही बाब पूर्णतः व्यक्तिसापेक्ष असून आपण आपल्या शरीराच्या संकेतांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

रोज किती कप कॉफी पिणे योग्य आहे?

अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या मते, एक निरोगी व्यक्ती दररोज ४०० मिलीग्राम कॅफिनचे सेवन करू शकते. कपनुसार सांगायचं तर, तीन-चार कप कॉफीमध्ये इतकं कॅफिन आढळून येतं.

दरम्यान, पोषणतज्ज्ञ सिमरुन चोप्रा यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, या तीन प्रकारच्या व्यक्तींनी मात्र कॉफीचे सेवन टाळायला हवे:-

१) ज्यांचे चयापचय मंद आहे
२) ज्यांना सतत अस्वस्थ वाटत असेल किंवा पॅनिक अटॅक येऊन गेला असेल
३) गरोदर महिला किंवा स्तनपान करणाऱ्या माता

याशिवाय सहसा विशिष्ट कारण नसेल तर कॉफीचा त्रास कुणाला होत नाही, त्यामुळे जर आपल्याला डॉक्टरने विशेषतः कॉफी वर्ज्य करायला सांगितले नसेल तर वर सांगितल्याप्रमाणात (शक्यतो त्याहून कमीच) कॉफीचे सेवन करायला हरकत नाही.