अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अंड्यामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे रोजच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. लहान मुलांना अधिक सुदृढ बनवण्यासाठी रोज अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. असे अनेक फायदे असणाऱ्या अंड्यांचा काहीजण नियमित आहारात समावेश करतात. तर काही घरात नाश्त्यामध्ये उकडलेल्या अंड्यांचा समावेश दररोज केला जातो. अंडी उकडताना कधीकधी ती फुटतात किंवा खराब होतात. काही टिप्स वापरून तुम्ही अंडी उकडत असताना फुटण्यापासून किंवा खराब होण्यापासून वाचवू शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घेऊया.
मोठ्या भांड्याचा वापर करा
गॅस वाचवण्यासाठी बऱ्याच वेळा अंडी उकडताना छोट्या भांड्याचा वापर केला जातो. पण छोट्या भांड्यात अंडी एकमेकांवर आपटून फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अंडी उकडताना मोठ्या भांड्याचा वापर करा.
आणखी वाचा : लहान मुलांसह मोठ्यांसाठी कोणते दूध असते फायदेशीर? गाईचे की म्हशीचे? जाणून घ्या
पाण्यात मीठ मिसळा
अंडी उकडण्याच्या पाण्यात सुरूवातीलाच थोडे मीठ टाका, यामुळे अंडी सोलताना त्याचे कवच सहजरित्या निघण्यास मदत होते. काही जणांना अंडी शिजवल्यानंतर त्याचे कवच नीट काढता येत नाही किंवा अंडे नीट शिजले नसेल तर कवच अंड्याला चिकटून बसते आणि ते नीट निघत नाही. त्यामुळे अंडी उकडताना त्या पाण्यात मीठ टाकावे यामुळे सहजरित्या कवच वेगळे करता येईल.
फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा
अंडी चांगली राहावी यासाठी आपण ती फ्रीजमध्ये ठेवतो. पण जेव्हा अंडी उकडायची असतील तेव्हा फ्रीजमधून काढून लगेच उकडायला ठेऊ नका. कारण असे केल्यास अंडी फुटण्याची किंवा खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे फ्रीजमधून बाहेर काढून अंडी १० ते १५ मिनिटं ठेवावी आणि त्यांनंतर उकडवावी. तसेच अंडी उकडताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा, यामुळे अंडी फुटणार नाहीत आणि व्यवस्थित शिजतील.
आणखी वाचा : मसाल्यांची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स; नक्की दिसेल फरक