Does Knuckle Cracking Cause Arthritis: नजर काढण्यासाठी, वाईट साईट बोलताना, किंवा अगदी आळस देताना कडाकडा बोटं मोडण्याची पद्धत आहे. एखाद्याला ओवाळून स्वतःच्या डोक्याजवळ बोटं मोडल्याने त्या माणसाला नजर लागत नाही असे म्हणतात तर एखाद्याकडे बघून दोन्ही हाताच्या मुठी वळून बोटं मोडली की त्या माणसाचं नुकसान होतं असंही म्हणतात. थोडक्यात काय तर बोटं मोडण्यावरून आपल्याकडे अनेक समज- गैरसमज व अगदी अंधश्रद्धा सुद्धा आहेत. पण त्यातील एक समज हा थेट आरोग्याशी संबंधित आहे आणि तो म्हणजे वारंवार बोटं मोडल्याने आर्थराइटिस (संधिवात) म्हणजेच हाडांचा आजार होण्याची भीती असते. तुम्हीही कधी ना कधी हे ऐकलंच असेल. पण यात कितपत तथ्य आहे आणि खरोखरच बोटं मोडण्याचे काही दुष्परिणाम आहेत का हे आपण आज तज्ज्ञांकडून जाणून घेऊया..
संधिवात (आर्थराइटिस) म्हणजे काय? (Arthritis Meaning)
हेल्थ शॉट्सने डॉ. अखिलेश यादव, असोसिएट डायरेक्टर – ऑर्थोपेडिक्स अँड जॉइंट रिप्लेसमेंट, मॅक्स हॉस्पिटल यांच्या हवाल्याने बोटं मोडणे याविषयी माहिती दिली आहे. डॉ. यादव सांगतात की, सांधे आणि आसपासच्या ऊतींना प्रभावित करणार्या विविध स्थितींविषयी बोलताना आर्थराइट्स म्हणजे संधिवात हा कॉमन शब्द वापरला जातो. जळजळ, सांधे कडक होणे, सांध्यांची हालचाल करताना दुखणे, लवचिकता कमी होणे असे सर्व त्रास यामध्ये समाविष्ट आहेत. सर्व वयोगटातील लोकांवर याचा परिणाम होत असला तरी, वृद्धांमध्ये हे अधिक सामान्य आहे. सांधेदुखीच्या काही सामान्य प्रकारांमध्ये ऑस्टियोआर्थरायटिस, संधिवात आणि सोरायटिक संधिवात यांचाही समावेश होतो.
बोटं मोडल्याने संधिवात होऊ शकतो का?
ऑर्थोपेडिकच्या मते, बोटं मोडल्याने संधिवात होत असल्याचे कोणतेही परिणाम ज्ञात नाहीत. अर्थात यावेळी येणारा आवाजाने असे वाटू शकते की आपण खरोखर हाडांना नुकसान पोहोचवत आहोत. डॉ. यादव म्हणतात की नकल क्रॅकिंग (बोटं मोडल्याने) संधिवात होतो हे मिथक अनेक वर्षांपासून कायम आहे. यावर कोणतेही वैज्ञानिक संशोधन किंवा अन्यथा सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमच्या बोटांमध्ये सांधे असतात आणि त्यात सायनोव्हीयल फ्लुइड असते, जे या सांध्यांना वंगण म्हणून मदत करतात. या द्रवामुळे तुमच्या सांध्यामध्ये नैसर्गिकरित्या बुडबुडे तयार होतात आणि जेव्हा तुम्ही तुमची बोटे ताणता किंवा मोडता तेव्हा दाबामुळे बुडबुडे वायू सोडतात आणि आवाज येतो.
हे ही वाचा<< Kidney Infection: किडनी निकामी होण्याचा धोका टाळण्यासाठी पावसाळ्यात ‘या’ १० सवयी स्वतःला लावा
आता लक्षात घ्या की, बोटं मोडल्याने संधिवात होत असल्याची शक्यता नसली तरी यामुळे नुकसान मात्र होऊ शकते. हे तुमच्या हाडांना जोडणाऱ्या सांध्यांना कमकुवत करू शकतात. त्यामुळे वारंवार बोटं मोडणे हे हानिकारक ठरू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)