आजकाल महिलांमध्ये मेकअप करण्याचं प्रमाण बरंच वाढलंय. पण जर उत्पादनं नीट निवडली नाही तर त्वचेसंदर्भात अनेक समस्या उद्भवू शकतात. महिलांना आपल्या त्वचेसंदर्भात विशेष काळजी असते. त्यासाठी त्या अनेक उत्पादनांचा वापर देखील करतात. अनेक मुलींना लिपस्टिकचा वापर केल्यामुळे ओठ फाटण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. आपल्याला असं वाटतं की जास्त वेळ लिपस्टिक लावून ठेवल्याने असे होते. परंतु लिपस्टिक लावताना आपण काही चुका करतो. याचा परिणाम असा की चांगल्या कंपनीची लिपस्टिक लावली तरीही काही वेळाने आपले ओठ फाटलेले आणि रुक्ष वाटतात. असे ओठ दिसायला फारच वाईट दिसतात. पाहुयात ओठ फाटण्यापासून आणि रुक्ष होण्यापासून वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो.

जर तुमचे ओठ लिपस्टिक लावण्यामुळे फाटत असतील तर लिपस्टिकची क्वालिटी तपासून पाहा. आपल्या ओठांसाठी ग्लॉसी लिपस्टिक निवडा किंवा आपल्या लिपस्टिकमधील इंग्रिडिएंट तपासून घ्या. जास्त काळ टिकणाऱ्या मॅट लिपस्टिकमध्ये तेलाचे प्रमाण फार कमी असते. अशा लिपस्टिक्स ओठ फाटण्याला जबाबदार ठरतात.

ओठांवर लिपस्टिक लावण्याआधी ओठ व्यवस्थितपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे. सातत्याने लिपस्टिक लावल्याने लिपस्टिकचा थर ओठांमधील फटांमध्ये जमा होतो. त्यामुळे चांगल्या लिप स्क्रबचा वापर करून ओठ योग्यरितीने स्क्रब करावेत. असे केल्याने ओठांवर साचलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल आणि लिपस्टिक जास्त काळापर्यंत ओठांना मुलायम बनवून ठेवेल.

लिप बाम लावण्याची सवय लावून घ्या. जेव्हाही तुम्ही मेकअप कराल तेव्हा लिपस्टिक लावण्याआधी ओठांना लिप बाम अवश्य लावा. यामुळे ओठांमधील आद्रता टिकून राहते आणि ते चमकदारही दिसतात.

लिपस्टिक लावण्याआधी लिप लायनरचा वापर करावा. लिप लायनर फक्त ओठांना योग्य शेप देण्यासाठीच कामी येत नाही तर हे पूर्ण ओठांना लावल्याने ओठांवर याचा एक थर तयार होतो. आणि यामुळे लिपस्टिक ओठांमधील फटांमध्ये अडकत नाही. तसेच यामुळे लिपस्टिक दीर्घकाळ टिकण्यासाठीही मदत होते.