Conjunctivitis Spread Signs And Treatment: मागील काही दिवसात मुंबई, पुणेसहित राज्यभरात डोळ्यांची साथ पसरली होती. आता सध्या समोर येणाऱ्या माहितीनुसार पुणे शहरात पुन्हा डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत डोळ्याच्या साथीचे ११ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यातील ५७१ रुग्ण हे २१ ऑगस्टच्या दिवसात आढळले आहेत. शालेय मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. ऐन सणांच्या दिवसांमध्ये आपल्यालाही त्रास सहन करावा लागू नये यासाठी आपण डोळे येण्याची लक्षणे, कारण, उपचार जाणून घेणार आहोत.
डोळे येण्याचं कारण काय? (Dole Yene Reasons)
डोळे येण्याची साथ प्रामुख्याने ॲडिनो विषाणूमुळे येते. एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर २ ते १४ दिवसांत लक्षणे दिसून येतात. हा संसर्ग २८ दिवसांपर्यंत राहतो. सर्वसाधारणपणे लक्षणे दिसू लागल्यानंतर सुमारे १३ दिवसांच्या आत बहुतांश रुग्ण बरे होतात.
डोळे येण्याची लक्षणे (Dole Yene, Conjunctivitis Signs)
- डोळ्यांमध्ये काही तरी गेल्यासारखे खुपते.
- एक-दोन दिवसांत डोळा लाल दिसू लागतो.
- डोळ्यांतून सुरुवातीला पाणी, नंतर चिकट घाण येऊ लागते.
- सकाळी उठल्यावर पुवाने दोन्ही पापण्या चिकटल्या जातात.
- डोळ्यांतून सतत पाणी येणे, जळजळ होणे व प्रकाश सहन न होणे.
डोळे येण्यावर घरगुती उपाय (Dole Yene Home Remedies)
प्राथमिक उपचार म्हणून तुम्ही खालील घरगुती उपाय करून पाहू शकता, पण जर त्रास अधिक होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.
डोळे आल्यावर आपण कापूर जाळून धूरी घ्यावी. यामुळे डोळ्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.
एरंडेल तेल काजळासारखे डोळ्याला लावल्याने डोळ्यातील पु बाहेर पडण्यास मदत होते.
चांदीच्या स्वच्छ दागिन्यांना काहीवेळ पाण्यात ठेवावे व मग ते पाणी डोळ्यात थेंबभर टाकल्याने आराम मिळतो.
ग्रीन टीच्या वापरलेल्या बॅग थोड्यावेळ फ्रीज मध्ये ठेवून नंतर त्या डोळ्यावर ठेवल्याने थंडावा मिळतो.
डोळे आल्यावर ड्रॉप वापरावा का? (Dole Yene Eyedrop)
दुसरीकडे HT ने डॉ वेंकट प्रभाकर यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह थांबवण्यासाठी ल्युब्रिकेशन ड्रॉप वापरता येऊ शकतात यामुळे डोळ्यातील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते तसेच डोळे लाल होणे, जळजळ सुद्धा कमी होऊ शकते.
हे ही वाचा<< १० रुपयात चिंचेच्या गाडीवर मिळणाऱ्या ‘या’ स्टारफ्रुटचे फायदे वाचून व्हाल थक्क; पावसाळ्यात तर करतं ‘हे’ मोठं काम
संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन, कोणतेही ओव्हर-द-काउंटर औषध घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण डोस प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो. याशिवाय डोळ्यात ड्रॉप टाकण्यापूर्वी सुद्धा खालील गोष्टींची काळजी घ्यावी.
- आय-ड्रॉप टाकण्यापूर्वी हात धुवा
- ड्रॉपरची टीप डोळ्यांच्या कोणत्याही भागाला स्पर्श करत नाही याची खात्री करा
- एकापेक्षा जास्त थेंब असल्यास पुढील थेंब टाकण्यापूर्वी ५ मिनिटे थांबा
- एकमेकांचे आय ड्रॉप शेअर करू नका.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)