अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले ट्रम्प, पण सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या पत्नीने, म्हणजेच मेलानिआ ट्रम्प यांनी, आपल्या फॅशनमुळे..
सेल्फ स्टेटमेंट म्हणजे नक्की काय, तर आपण जे कपडे परिधान करतो, त्या कपडय़ांनुसार आपल्या हावभावात होणारे बदल, आपला बदलत जाणारा कॉन्फिडन्स. आपण कशा प्रकारचे कपडे घालतो त्यावरून आपली ओळख ठरते. समोरच्याच्या नजरेत आपला ठसा उमटवण्यासाठी आपला पोशाख हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. आपण काय घातलंय यानुसार आपली पातळी ठरवली जाते; किंबहुना आपण स्वतदेखील काय घातलंय यानुसार आपला कम्फर्ट झोन ठरवत असतो. शिक्षक म्हटलं की लगेच कडक इस्त्रीचा शर्ट-पॅन्ट किंवा कॉटनची, खादीची व्यवस्थित नेसलेली साडी डोळ्यासमोर येते किंवा मॉडेल्स म्हटलं कीफॅशनेबल ब्रॅण्डेड ड्रेस डोळ्यासमोर येतात. नेतेमंडळींचेही तेच. त्यांच्या घरच्यांनादेखील त्यांच्याप्रमाणेच टापटीप पोशाख परिधान करावा लागतो. पण आजकाल अनेक नेत्यांच्या बायका फक्त आपल्या नवऱ्याची शान राखावी यासाठी नाही तर समाजात स्वतचं अस्तित्व निर्माण व्हावं म्हणून तशा प्रकारचा पोशाख परिधान करतात.
आता डोनाल्ड ट्रम्पच्या बायकोचंच उदाहरण घ्या ना. मेलानिआ ट्रम्प यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाच्या पहिल्या दिवशी केलेल्या पोशाखाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी मॉक टॅर्टलनेक असलेला, क्रॉप्ड कट जॅकेट विथ थ्री फोल्ड स्लीव्हस आणि लाँग मॅचिंग ग्लोव्हस्, गुडघ्यापर्यंतचा आकाशी रंगाचा ड्रेस घातला होता. हा ड्रेस त्यांनी खास राल्फ लॉरेन या डिझायनरकडून डिझाइन करून घेतला होता. अमेरिकेतील लोकांच्या नजरा खास उद्घाटनाच्या दिवशी ट्रम्पच्या बायकोची फॅशन बघायला खिळल्या होत्या. फक्त मेलानिआ ट्रम्पच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवान्का हीदेखील फॅशनच्या बाबतीत अमेरिकेन जनतेचं लक्ष वेधून घेणारी ठरली.
उद्घाटनाच्या संध्याकाळी मेलानिआ ट्रम्प यांनी नोरीसोल फेरारी या डिझायनरकडून डिझाइन करून घेतलेला गुडघ्यापर्यंत घोळणारा प्लेन ब्लॅक कोट घातला होता. त्याच्या हिपला पेपलम टच होता. त्या कोटची स्टॅण्ड कॉलर मिल्रिटीवाल्यांच्या कॉलरसारखी होती. त्या रुबाबदार कोटची शान आणखी वाढावी यासाठी त्यांनी त्यावर ब्लॅक ब्रॅण्डेड सनग्लासेल, ब्लॅक लेदर ग्लोवस् आणि ब्लॅक हाय हिल स्टीलेटोज घातले होते. मेलानिआ ट्रम्पचे हे साधे सरळ लुक काही जणांना डोळ्यात भरणारे आणि तर काहींना कंटाळवाणे वाटतील.
शपथविधीच्या आदल्या रात्रीच्या डिनर पार्टीचा मेलानिआ यांचा ड्रेस आणि शपथविधी समयीचा ड्रेस यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. डिनरच्या रात्री त्यांनी प्लेन आऊटफिटऐवजी त्वचेला घट्ट बसणारा, झगमगीत असा लोन्ग गोल्डन गाऊन घातला होता. तो प्रसिद्ध लेडी डिझाईनर रिम एक्राने डिझाईन केला होता. रिम एक्राने मॅडोना बियोन्स, अँजलीना जॉली यांसारख्या अनेक हॉलीवूड सेलिब्रेटीजचे कपडे डिझाईन केले आहेत.मेलानिआ ट्रम्प स्वतच्या स्टाइलच्या बाबतीत नेहमीच दक्ष असतात. त्यांना स्किनफिटिंग सिम्पल आणि सोबर ड्रेसेस फार आवडतात. त्या पूर्वाश्रमीच्या मॉडेल आहेत. आणि नंतरही त्यांनी स्वत:ला मेंटेन ठेवले आहे. त्यामुळे कोणताही लुक त्यांच्यावर खुलून दिसतो. ट्रम्प यांच्या शपथविधी प्रसंगी मेलानिआ ट्रम्प यांचा ड्रेस डिझाइन करण्यासाठी अनेक डिझाइनर्सची चढाओढ लागली होती, त्यांच्यात वादविवाददेखील झाले. मेलानिआ यांच्या मते फॅशन ही एक उत्तम कला आहे.
कपडय़ांसोबतच मेलानिआ ट्रम्प ज्वेलरीच्या बाबतीतही अगदी चोखंदळ आहेत. मेलानिआ यांनी आपलं स्वतचं ज्वेलरी कलेक्शन दोन वेळा लॉन्च केलं होतं. त्यात त्यांनी कॉकटेल िरग्स, लेदर वॉचेस आणि स्टेटमेंट नेकलेसेसची भर घातली. त्यांच्या कलेक्शनचं नाव मेलानिया टाइमपिसेस अॅण्ड ज्वेलरी असं ठेवण्यात आलं. त्यांना मोठय़ा आणि हेवी नेकपिसेसची आवड असल्यामुळे त्यांच्या कलेक्शनमध्ये मोठय़ा कॉकटेल िरग्स, ब्राइडेड गोल्डन नेकपिसेस, लार्ज कफ्स, गोल्ड टोन वॉचेस यांचा समावेश असतो. ही ज्वेलरी क्रिस्टल आणि प्रेशिअस स्टोनपासून बनवण्यात येते. ती सर्वाना परवडणारी, लोकांच्या चटकन मनात भरेल अशी, सहज कोणत्याही दुकानात उपलब्ध असेल अशा प्रकारची आहे असे मेलानिआ ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
अमृता अरुण – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा