नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे आजारी व्यक्तीला आवर्जून नारळ पाणी प्यायला दिले जाते. त्यात अनेक जण सकाळी नारळ पाणी पितात. कारण- नारळ पाणी केवळ तहान भागवत नाही, तर आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जादेखील देते. पण, नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती तुम्हाला माहीत आहे का? याच संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे; ज्यात दररोज सकाळी १० वाजता फक्त एक ग्लास नारळ पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणास मदत होते, त्वचेचे हायड्रेशन सुधारते आणि बॅक्टेरियाच्या संसर्गास प्रतिबंध होतो, असे म्हटले आहे. त्यामुळे नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती याबाबत नोएडामधील शारदा हॉस्पिटलचे एमडी (इंटर्नल मेडिसिन) डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना योग्य उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नारळाच्या पाण्यात कमी कॅलरीज असतात. ‘मेडिकल न्यूज टुडे’च्या अहवालानुसार एक ग्लास नारळ पाण्यात फक्त ४५ कॅलरीज असतात. म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला सोडा किंवा इतर शर्करायुक्त पेये घेण्याचा मोह होतो तेव्हा नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

त्यावर मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिन, वरिष्ठ सल्लागार डॉ. पंकज चौधरी यांनी आवाहन केले की, आजार किंवा डिहायड्रेशनच्या समस्या असलेल्या लोकांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. निरोगी लोकांनी दररोज नारळ पाणी पिण्याची काही गरज नसते.

याच मुद्द्यावर डॉ. श्रेय श्रीवास्तव म्हणाले की, नारळाचे पाणी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील चयापचय किक स्टार्ट करते. त्यामुळे संध्याकाळऐवजी सकाळी लवकर नारळाचे पाणी पिणे आणि ते कमी प्रमाणात पिणे फायदेशीर आहे.

नारळाचे पाणी हा एक उत्कृष्ट नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट स्रोत आहे; ज्यामुळे व्यायामानंतर रीहायड्रेशनसाठी तो एक चांगला पर्याय बनतो, अशी माहिती ‘द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या स्किन स्पेशालिस्ट, कॉस्मेटिक स्किन स्पेशालिस्ट व स्किन सर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी दिली.

‘या’ लोकांनी नारळ पाणी पिणे टाळावे?

तुमच्या रक्तात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यास नारळ पाणी पिऊ नका. कारण- नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनीचा आजार असलेल्यांनी आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी ते पिणे टाळावे, असे डॉ. श्रीवास्तव म्हणाले.

काही लोकांना झोपण्याच्या आधी नारळ पाणी पिणे सुखदायक व हायड्रेटिंग पर्याय वाटतो; परंतु त्याचा तुमच्या आरोग्य आणि झोपेवर कसा परिणाम होतो हे तपासावे, असे डॉ. कपूर म्हणाले.

कारण- प्रत्येक व्यक्तीवर नारळ पाणी प्यायल्यानंतर दिसणाऱ्या शारीरिक प्रतिक्रिया भिन्न असतात. म्हणून डॉक्टर कपूर यांनी सल्ला दिला की, प्रत्येकाने स्वत:च्या शरीराचे ऐकले पाहिजे आणि आवडी व चवीनुसार नारळ पाणी पिण्याचा आनंद घेतला पाहिजे.

नारळ पाणी हा एक आरोग्यदायी पर्याय असला तरी त्यातील नैसर्गिक साखरेमुळे त्याचे योग्य प्रमाणातच सेवन करणे आवश्यक आहे, असेही डॉ. कपूर यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drink coconut water benefits when to have what is the best time to drink coconut water sjr
Show comments