दिवसातून चार वेळा चहा किंवा कॉफी प्यायल्याने यकृताचा आजार होण्याची शक्यता कमी असते, अशी माहिती सिंगापूरमध्ये झालेल्या एका संशोधनातून पुढे आली आहे. विशेष म्हणजे या संशोधकांपैकी एकजण भारतीय वंशाचा आहे.
ड्यूक नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर ग्रॅज्युएट मेडिकल स्कूल आणि ड्यूक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन यामधील संशोधकांनी चहा आणि कॉफी पिण्याचे फायदे या विषयावर संशोधन केले. त्यामध्ये त्यांना कॉफीतील कॅफिन या घटक पदार्थाचा ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर’ आजार असणाऱयांना फायदा होतो. जगभरात सध्या मधुमेह आणि स्थूलता असलेल्या ७० टक्के रुग्णांमध्ये ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर’ आजार असल्याचे आढळते. त्यांच्यासाठी चहा किंवा कॉफी हे पेयपदार्थ वरदान ठरू शकतात.
मुळात ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर’ या आजारावर कोणतीही उपचारपद्धती उपलब्ध नाही. केवळ आहार व्यवस्थापन आणि व्यायाम या माध्यमातूनच हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो. कॅफिन या घटकपदार्थामुळे यकृतातील पेशीमध्ये असलेल्या द्रव्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे यकृताचा आकार मर्यादेत राहतो, असे संशोधकांना आढळल्याचे पॉल येन आणि रोहित सिन्हा या दोन संशोधकांनी सांगितले.

Story img Loader