नवी दिल्ली : उत्तम आरोग्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र पाण्याचे प्रमाण अतिरिक्त असणे आरोग्यासाठी हितकारक नाही. मानक सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वानुसार (स्टँडअर्ड पब्लिक हेल्थ गाइडलाइन्स) दररोज दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र जपानी संशोधकानुसार दररोज दोन लिटर पाणी पिणेही अतिरिक्त आहे.
दररोज दोन लिटर पाणी प्यावे या आरोग्यदायी शिफारशीला वैज्ञानिकदृष्टय़ा कोणताही आधार नाही, असे जपानच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोमेडिकल इनोव्हेशनचे योसुके यामादा यांनी सांगितले. यामादा यांच्या वैद्यकीय संशोधकांच्या गटाने पाणी आणि आरोग्यावर संशोधन केले आहे. दररोज १.५ ते १.८ लिटर पाणी पिणे पुरेसे आहे. १.८ लिटरपेक्षा अधिक पाणी प्राशन करणे योग्य नाही. कारण आहारातूनही आपल्याला पुरेसे पाणी मिळत असते. जोपर्यंत तुमचा आहार केवळ बेकरीचे पदार्थ, अंडी, मैद्याचे पदार्थ असा नाही, तोपर्यंत तुमच्या पाण्याच्या गरजेपैकी ५० टक्के पाणी अन्नातून मिळवू शकता, असे यामादा यांनी सांगितले. या संशोधकांच्या गटाने २३ देशांमधील ५,६०० व्यक्तींचा पाण्याचे सेवन आणि आरोग्य याबाबतचा अभ्यास केला. प्रत्येक दिवशी मानवी शरीरात पाण्याचा वापर यावर या संशोधकांनी संशोधन केले. २० ते ३५ वयोगटातील पुरुष सरासरी ४.२ लिटर आणि ३० ते ६० वयोगटातील महिला सरासरी ३.३ लिटर पाण्याचे सेवन करतात, असे या संशोधनात आढळून आले. वयोमानानुसार पाण्याची गरज कमी होते, तर हवामान आणि डोंगराळ भाग यांचाही परिणाम पाणी सेवनावर होतो, असेही त्यांनी सांगितले.