हॉट चॉकलेट घ्या, बुद्धी तल्लख ठेवा, असा एक नवा मंत्र अमेरिकेतील काही संशोधकांनी दिलाय. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी तर हा मंत्र अधिक उपयुक्त आहे. वाढत्या वयोमानानुसार मेंदूच्या कार्याचा वेग मंदावतो. यामुळे विचार करण्याची प्रक्रियाही मंदावते. या सर्वांवर हॉट चॉकलेटच्या माध्यमातून मार्ग शोधला जाऊ शकतो, असे संशोधनातून पुढे आले आहे.
दिवसातून दोन वेळा हॉट चॉकलेट घेतल्याने बुद्धी तल्लख होते आणि माणसाची विचारप्रक्रियाही गतिमान होते, असे संशोधनातून आढळून आले. अमेरिकेतील संशोधकांनी सरासरी ७३ वयोमान असलेल्या ६० लोकांचा अभ्यास केला. या सर्वांनी सुमारे महिनाभर दिवसातून दोन वेळा हॉट कोको घेतले. यानंतर घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये यापैकी अनेक लोकांची बुद्धी अधिक तल्लख झाल्याचे आढळून आले.
संशोधनात सहभागी झालेल्यांच्या स्मृती आणि विचारप्रक्रियेशी संबंधित चाचण्या घेण्यात आल्या. या सर्वांच्या मेंदूतील रक्तप्रवाहाचा वेग जाणून घेण्यासाठी त्यांच्या अल्ट्रासाऊंड चाचण्याही घेण्यात आल्या.
एकूण ६० जणांपैकी १८ जणांच्या मेंदूतील रक्तपुरवठ्याचा वेग सुरुवातीला खूप कमी होता. मात्र, महिन्याभरानंतर त्यांच्या मेंदूतील रक्तपुरवठ्यामध्ये ८.३ टक्क्यांनी सुधारणा झाली, असे बॉस्टनमधील हॉर्वर्ड मेडिकल स्कूलचे फरझान सोरॉंड यांनी सांगितले. मेंदूतील रक्तप्रवाहाचा वेग आणि बुद्धीचा तल्लखपणा याचा संबंध असतो, असे सोरॉंड यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा