दूध आणि मध हे दोन्हीही पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे असतात. पण विशेष म्हणजे हे दोन्ही घटक जेव्हा एकत्ररितीने घेतले जातात. तेव्हा त्याचा जास्त चांगला फायदा होतो. दुधात मध घालून पिणे हे एक उत्तम आरोग्यदायी पेय असते. मधामध्ये अँटीऑक्सिडंटस, अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीफंगल घटक असतात जे शरीर सुदृढ ठेवण्यास मदत करतात. याशिवाय मध हा श्वसननलिकेशी निगडीत तक्रारींवरही उपयुक्त असतो. तर दूध हे व्हिटॅमिन आणि खनिजांचा उत्तम स्त्रोत असतो. दूधात अ,ब आणि ड व्हिटॅमिन तसेच कॅल्शियम, प्रथिने तसेच लॅक्टीक अॅसिड असते. पाहूयात या अनोख्या पेयाचे शिवानी दिक्षित यांनी सांगितलेले काही फायदे…

त्वचेसाठी उत्तम

हे दोन्ही पदार्थ एकत्रित घेतल्याने त्याचा शरीराला फायदा होतो. यामध्ये त्वचा नितळ आणि तजेलदार राहण्यास मदत होते. मध आणि दूध समप्रमाणात घेऊन ते आंघोळीच्या पाण्यात घाला. त्याचा त्वचा मुलायम होण्यास उपयोग होतो.

पचनक्रियेसाठी फायद्याचे

पचनशक्ती सुधारण्यासाठी हे दोन्ही घटक एकत्रितपणे घेतलेले चांगले असते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनीही हे पेय नियमित घ्यावे.

ताकद वाढण्यासाठी उपयुक्त

ताकद वाढण्यासाठी दूध आणि मध यांचे मिश्रण अतिशय उत्तम असते. या दोन्हीमध्ये असणारे कार्बोहायड्रेटस शरीराची ताकद वाढविण्यास मदत होते. त्यामुळे दैनंदिन कामे करणे सोपे होते.

हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त

दूधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने हाडांच्या बळकटीसाठी दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर आणि तज्ज्ञांकडून दिला जातो. त्यामध्ये मध घातल्यास त्याचा आणखी चांगला फायदा होतो. यामुळे हाडांना येणारी सूज आणि हाडांशी निगडीत इतर तक्रारी दूर होण्यास मदत होते.

झोपेच्या तक्रारी होतात दूर

झोप न येणे, वारंवार जाग येणे, जास्त झोप यांसारख्या झोपेशी निगडीत तक्रारी अनेकांना असताात. परंतु दूध आणि मध यांचे मिश्रण झोपेच्या तक्रारी दूर होण्यासाठी उपयुक्त ठरतात. इन्सुलिनची पातळी योग्य राहण्यासाठी हे उपयुक्त असते.