उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी उसाचा रस उत्तम मानला जातो. पण आता उन्हाळा संपून पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डॉक्टर अनेकदा उसाचा रस पिण्यास मनाई करतात. कारण पावसाळ्यात उसाचा रस आरोग्यासाठी चांगला नसतो असं काही डॉक्टरांचं मत आहे. ऊस हे एक बारमाही पिक असून त्याला गोड चव असते. उसामध्ये कार्बोहायड्रेट्स, इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि भरपूर लोह असते. तसेच जीवनसत्त्वे ए, बी आणि सीसह अनेक पोषक घटक असतात. ते एंटीऑक्सिडेंट समृद्ध आणि त्यामध्ये कमी ग्लाइसेमिक इंडेक्स असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऊस खाणे रस पिण्यापेक्षा उत्तम –

फक्त उसाचा रस पिण्यापेक्षा ऊस खाणे आरोग्यासाठी चांगले असल्याचं मानले जाते. कारण ऊस खाल्याने शरीराला थेट फायबर मिळते. जे पचनसंस्थेसाठी खूप चांगले असते. ज्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. तसेच उसाचा रस प्यायल्यानेही अनेक प्रकारची पोषक तत्वे मिळतात. पण पावसाळ्यात हा रस अयोग्य ठरु शकतो.

पावसाळ्यात उसाचा रस पिण्याचे दुष्परिणाम –

  • संसर्ग होऊ शकतो –

पावसाळ्यात उसाचा रस प्यायल्याने पोटात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. ज्यूस बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मशीनमध्ये धोकादायक जीवाणू हळूहळू जमा होतात. ज्यामुळे जुलाब, उलट्या, पोटदुखी अशा संसर्गाचा धोका वाढू शकतो. जेव्हा तुम्ही उसाचा रस प्याल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तो स्वच्छ पद्धतीने तयार केला असावा.

  • जास्त प्रमाणात साखर असणे –

उसाचा रस हा साखरेचा नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळे उसाचा रस जास्त प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह असलेल्या लोकांनी हा रस पिणे टाळावे. तरीही तुम्ही पित असाल तर तो एका मर्यादित प्या तसेच डॉक्टरांचा सल्लाही घ्या.

हेही वाचा- पावसाचा जोर वाढताच बुरशीजन्य आजाराचे रुग्ण तिप्पट; नायटा, गजकर्णच्या रुग्णांची त्वचारोग तज्ज्ञांकडे गर्दी

  • ऍलर्जी –

काही व्यक्तींना ऊस किंवा त्याच्या रसाची ऍलर्जी असू शकते. ऍलर्जीची प्रतिक्रिया ही खाज सुटणे आणि पुरळ उठणे यासारख्या सौम्य लक्षणांपासून ते श्वास घेण्यास त्रास होण्यापर्यंत असू शकते.

  • कीटकनाशक औषधाचा समावेश –

कीटक आणि रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी उसावर अनेकदा कीटकनाशकांची फवारणी केली जाते. या कीटकनाशकांचे काही अवशेष उसावर राहू शकतात आणि ते रसात जाऊ शकतात. कीटकनाशकांच्या अवशेषांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

  • पचनक्रियेशी संबंधित समस्या –

काही लोकांना उसाचा रस प्यायल्यानंतर पचनक्रियेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. गॅस किंवा जुलाब यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)