ई-सिगारेट आरोग्यासाठी सुरक्षित असून, त्यामुळे कर्करोगाचा धोका नसतो, असा दावा जरी केला जात असला तरी ई-सिगारेटनेही कर्करोग होऊ शकतो, असे अमेरिकी संशोधकांनी म्हटले आहे. ई-सिगारेटचे सेवन केल्याने शरीरातील रक्तपेशीवर आघात होत असतो आणि त्यामुळे कर्करोगाचाही धोका आहे, असे या संशोधकांनी म्हटले आहे.
या संशोधकांनी सर्वसाधारण सिगारेट आणि ई-सिगारेटचा त्यासाठी अभ्यास केला. या अभ्यासनंतर संशोधकांनी ई-सिगारेटही आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचा दावा फोल असल्याचे सांगितले. तुम्ही जरी निकोटीनमुक्त तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करत असाल तरीही ते आरोग्यासाठी बाधकच असते. त्यामुळे रक्तातील पेशींना बाधा पोहोचते, असे या संशोधकांनी सांगितले. मात्र सध्याचे परीक्षण हे केवळ ई-सिगारेटमध्ये समाविष्ट रसायनामुळे कर्करोग बळावण्याच्या शक्यतेपुरतेच मर्यादित आहे, असे संशोधकांनी सांगितले. यासाठी आवश्यक प्रयोगशाळांची उपलब्धता नसल्याने मानवी शरीरातील पेशींवर उत्पादनातील कोणत्या घटकांचा विपरीत परिणाम होतो, याबाबत भाष्य करणे कठीण असल्याचे मत कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या प्राध्यापिक आणि या संशोधन गटाचे प्रमुख डॉ. जेसिका वाँग-रोड्रिक्यूज यांनी व्यक्त केले.
संशोधकांनी ई-सिगारेटमधील निकोटीनयुक्त व निकोटीनविरहित घटकांचा अभ्यास केला.
त्यात निकोटीनयुक्त घटकाचा परिणाम हा घातक स्वरूपाचा असला तरी निकोटीनविरहित घटकही पेशींवर विघातक परिणाम करत असल्याचे दिसून आले.
अनेक संशोधकांनी सिगारेटमध्ये निकोटीन असल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे म्हटले असले तरी सिगारेटमधील अन्य घटकांचाही आरोग्यावर विघातक परिणाम होत असल्याचे वाँग-रोड्रिक्यूज यांनी म्हटले आहे.

Story img Loader