धूम्रपानास ई-सिगारेट्स पर्याय दिला जात असला तरी त्यामुळे तोंडात संसर्ग, हिरडय़ांना सूज व कर्करोग हे धोके असतात. असे नवीन संशोधनात म्हटले आहे. संशोधकांच्या मते जिंजिव्हल एपिथेलियम पेशी जेव्हा ई-सिगारेटच्या वाफेस सामोऱ्या जातात तेव्हा त्यांचे आरोग्य बिघडते, असे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे. तोंडातील एपिथेलियम हे सूक्ष्म जिवाणू संरक्षणातील पहिली फळी असतात. तोंडात बरेच जिवाणू असतात त्यांच्यापासून ते संरक्षण करतात. एपिथेलियम पेशी एका छोटय़ा कक्षात ठेवून त्यांना ई-सिगारेटची वाफ दिली असता त्यात दोष निर्माण झाले. इलेक्ट्रॉनिक सिगारेटची वाफ पाच सेकंद दोन वेळा घेतली व दिवसातून पंधरा मिनिटे घेतली तरी हा परिणाम होतो. सूक्ष्मदर्शकाखाली बघितले असता या पेशी त्या वाफेमुळे मरण्याचे प्रमाण जास्त असते. एकदा वाफ घेतल्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमण १८ टक्के, दोनदा घेतल्याने ४० टक्के तर तीनदा घेतल्याने ५३ टक्के वाढते. ई-सिगारेट म्हणजे नुसती पाण्याची वाफ नसते, असे संशोधक रोबिया यांनी म्हटले आहे. त्यात टार नसले तरी त्यामुळे तोंडातील व श्वसनमार्गातील उती मरतात. कारण ई-सिगारेटमध्ये व्हेजिटेबल ग्लिसरिन, प्रापलिन ग्लायकॉल व निकोटिन अॅरोम यांचा समावेश असतो. ते तापल्याने हा परिणाम होतो. संरक्षक फळीतील पेशी मरण पावल्याने संसर्ग होऊन तोंडात सूज येते, हिरडीचे विकार होतात व कर्करोगही जडतो, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. सेल्युलर फिजिओलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)