मलेरियामुळे जगात दरवर्षी ५ कोटी १९ लाख, तर भारतात १० लाख ६ हजार नागरिकांचा मृत्यू होत असून त्यामध्ये शून्य ते चौदा वषार्ंपर्यंतच्या बालकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्य़ात गेल्या एक वर्षांत शंभर नागरिकांचा मृत्यू झाल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे. सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर अवलंबून न राहता नागरिकांनीच मलेरिया होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन शहरातील तज्ज्ञांनी केले आहे.
गेल्यावर्षी भारतात १८ लाख नागरिकांना मलेरियाची लागण झाली होती. जगात दरवर्षी ३० ते ५० कोटी नागरिक मलेरियाने ग्रस्त असतात. त्यातील लाखो नागरिक मृत्यूच्या खाईत ढकलले जातात. सर्वाधिक मलेरिया होण्याऱ्या देशांमध्ये पश्चिम आशिया खंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, बांगलादेश या देशांचा समावेश आहे. तर मध्य आफ्रिकेतील बहुतांश देशात मलेरियाचे प्रमाण अधिक आहे. त्यात एकटय़ा इथोपिया या देशातील लाखो नागरिक मलेरियाने दरवर्षी मृत्युमुखी पडत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियावर प्रतिबंध घालण्यासाठी सर्वच देशांनी उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले असतानाही जनजागृतीच्या अभावी मलेरियामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ७ एप्रिल २०१४ मध्ये युरोपातील देशांना मलेरियापासून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. युरोपातील नागरिकांना पश्चिम आशिया खंडातील नागरिकांकडूनच खरा धोका असल्याचेही म्हटले आहे.
एनोफिलिस जातीचा डास चावल्याने मलेरिया हा आजार होतो. मानवाच्या शरीरात विषाणू प्रवेश करून पोटात जातात व आपली संख्या वाढवतात. त्यानंतर तांबडय़ा रक्तपेशीमध्ये ते स्वत:हून मिसळतात. प्लासपोडियम फेल्सीपेरम, प्लासमोडियम वाइव्ॉक्स, प्लासमोडियम मलेरिया आणि प्लासमोडियम ओवेल हे मलेरियाचे चार प्रकार असून त्यामध्ये फेल्सीपेरम मलेरिया हा सर्वात धोकादायक असल्याची माहिती शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. एनोफिलिस जातीचा डास मलेरियाच्या विषाणूंचे संक्रमण करतो. मलेरिया झालेल्या व्यक्तीला हा डास चावतो व रक्त शोषत असतानाच मलेरियाचे विषाणू डासाच्या शरीरात प्रवेश करतात. तोच डास मलेरिया न झालेल्या व्यक्तीला चावतो. तेव्हा त्याच्या शरीरात ते विषाणू प्रवेश करतात व त्यालाही मलेरियाची लागण होते.
ताप, डोकेदुखी, उलटी आदी लक्षणे डास चावल्यानंतर १० ते १५ दिवसात दिसून येते. वेळीच उपचार केला नाही तर अधिक धोकादायक स्थिती निर्माण होते. मलेरिया झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील महत्त्वपूर्ण भागांना रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळेतच उपचार करणे आवश्यक आहे. मलेरियाचे निदान आधी होणे गरजेचे असते. वेळेतच त्यावर उपचार केले तर त्याला आपण आटोक्यात आणू शकतो व त्याचा कालावधी कमी करू शकतो. क्लोरोक्विन अथवा कुनॅन ही औषधे फायदेशीर ठरतात. लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष करू नये. थंडी वाजून ताप आल्यास रक्त तपासून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, अशी सूचनाही डॉ. बोधनकर यांनी केली.
मलेरियाची औषधेही आता काम करेनाशी झाली आहेत. तसेच डासांना मारणाऱ्या औषधांनाही डास जुमानत नाही. त्यामुळे जगात सर्वत्रच डासांची पैदास होत आहे. त्यासाठी आता समाजानेच मोहीम राबवायला हवी. सरकारच्या भरवशावर राहू नये. शक्यतो प्रत्येकानेच आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. परिसरात डबके साचू देऊ नये. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनीही मलेरियाबाबात विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी. असे झाले तरच मलेरियावर काही प्रमाणात आळा बसेल, अशी आशाही डॉ. बोधनकर यांनी व्यक्त केली. जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियापासून होणाऱ्या मृत्युसंख्येत २०१० पासून घट होत असल्याचा दावा केला आहे. तसेच मलेरियापासून होणारे मृत्यू २०१५ पर्यंत थांबवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु लोकांमध्ये जागृती होत नाही, तोपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य होणार नसल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.  नागपूर शहरात स्वच्छतेच्या बाबतीत सुधारणा झाल्याने मलेरियाचे प्रमाण कमी दिसून येते. परंतु पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्य़ांमध्ये मलेरियाचे प्रमाण अधिक आहे. याच भागात मलेरियामुळे बालकांचे मृत्यू मोठय़ा संख्येने होत असल्याची माहिती शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद माने यांनी दिली. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत नागपूर शहरात ७९ नागरिकांना तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०१४ पर्यंत ५ नागरिकांना मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले आहे. डासांची प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे उपलब्ध औषधांमुळे डास मरत नसल्याचे दिसून येत आहे. डास मारणाऱ्या केमिकल युक्त औषधांचा विपरीत परिमाण होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे. कुठल्याही सरकारी उपाययोजनांवर अवलंबून न राहता मलेरिया होणार नाही, याची खबरदारी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी, अशी सूचनाही डॉ. माने यांनी केली आहे.
डॉक्टरांचा सल्ला
*  डॉक्टरांनी सांगितलेली औषधी वेळेवर घ्या.
*  मुलांची खेळणी नीट धुवून स्वच्छ करून वापरावयाला द्या.
*  मांजर, कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्याचा सांभाळ जपून करावा.
* अन्न हवारोधक डब्यांमध्ये ठेवा.
* लहान मुलांसमोर धूम्रपान करू नका.
* एखाद्या उत्पादनातील केमिकल्सची मुलाला अ‍ॅलर्जी आहे, असं लक्षात आलं तर ती वस्तू टाळा.

Story img Loader