आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते. पण त्यासाठी नेमके काय करायला हवे हे आपल्याला माहित नसते. त्यातही रोजची धावपळ आणि वेळेचे गणित यामध्ये आपण स्वत:कडे दुर्लक्ष करतो. पण दिवाळीसारखा एखादा सण आला की मात्र आपण सर्वांमध्ये उठून दिसावे असे कोणत्याही वयातील स्त्रिला वाटते. नेहमी जरी आपण मेकअप करत नसलो तरी सणाला मात्र मेकअप केल्यास आपण उठून दिसतो. मेकअपच्या काही सोप्या टीप्स अशावेळी नक्कीच उपयोगी ठरतात. त्यामुळे आपल्या सौंदर्यात तर भर पडते आणि स्वत:ला चांगल्या पद्धतीने कॅरी केल्यास आपला आत्मविश्वासही वाढतो. घरच्याघरी सहज करता येतील अशा टीप्स असल्याने तुमच्या खिशालाही फारसा भार पडणार नाही. दिवाळी हिवाळ्यात येत असल्याने कोरड्या त्वचेच्या समस्या लक्षात घेऊन चांगला मेकअप करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेकअप करताना प्रत्येक घटक खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक गोष्ट प्रमाणातच वापरली जाणे तेवढेच महत्त्वाचे असते. तसेच आयमेकप हा त्यातील अविभाज्य भाग आहे. कोणत्याही समारंभासाठी जाताना इतर मेकअप नसेल तरीही चालतो, परंतु आय मेकअप असेल तरीही तुम्ही उठावदार दिसू शकता. डोळे जेवढे उठावदार असतात,तेवढे तुम्ही उठावदार दिसता. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या त्वचेची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे असते. त्वचा चांगली असेल तर तुमच्या लूकमध्ये निश्चितच भर पडते. त्यासाठी घाईच्या वेळेत झटपट होतील आणि सोप्या असतील अशा या मेकअप टीप्सचा नक्की वापरुन पाहा…

त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या

थंडीत त्वचा लवकर कोरडी पडते. त्यामुळे मेकअप केला तरीही चेहरा कोरडा दिसतो. त्यामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यासाठी रात्रीच्या वेळी झोपताना चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावावे. याशिवाय ऑलिव्ह ऑईलही त्वचेची आर्द्रता टीकून राहण्यास मदत होते.

डोळ्यांचा मेकअप

नॅचरल आय मेकअप करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे प्रमाणापेक्षा बाहेर कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करू नये. हा लुक करण्यासाठी काजळ पेन्सिल हलक्या हातांनी आपल्या डोळ्यांच्या खालच्या व वरच्या वॉटर लाइनवरून फिरवावी. त्यांनी डोळ्याचा आकार उठून दिसेल. त्यांनतर पापण्यांना मस्कारा लावावा. डोळ्याच्या आयलाइनरचा बारीक लाइन लावून लुक पूर्ण करावा. तसेच एखाद्या समारंभाला जायचे असेल तर ग्लिटर्स, शिमर्स आयशॅडोज् आवर्जून वापरा. बेस पेस्टल कलर ठेऊन त्याला शोभून दिसणारी गोल्डन किंवा सिल्वर ग्लिटर आय शॅडो लावा. या लुकमध्ये चेहऱ्यालासुद्धा बेस मेकअप करणे आणि लिपस्टिक वापरणे गरजेचे आहे.

लिप बाम आणि लिपस्टीक

चेहरा थकल्यासारखा वाटत असेल तर लिप बामचा वापर करा. त्यामुळे चेहऱ्यावरचा थकवा कमी जाणवतो. तसेच हा लिप बाम ओठांना लावल्याने ओठ कोरडे पडले असतील तर ते चमकदार दिसतात. लिप बाम थोड्या प्रमाणात गालावर लावल्यास तुम्ही नकळत ताजेतवाने वाटता. लिपस्टीक लावतानाही तुमच्या कपड्यांना साजेशी लिपस्टीक निवडा. शक्यतो मॅचिंग होईल अशी हलकी लिपस्टीक लावा. लीप लायनर लावल्याने ओठ उठावदार दिसण्यास मदत होईल. दिवाळीला सकाळी मेकअप करत असाल तर गुलाबी किंवा आबोली अशा फिकट रंगाच्या लिपस्टीकचा वापर करा. संध्याकाळच्या वेळी थोडा गडद रंग चालू शकेल.

फाऊंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर

चेहऱ्यावरील रंग खुलून दिसावा यासाठी कॉम्पॅक्ट लावणे गरजेचे आहे. यातही चांगल्या कंपनीची उत्पादने वापरल्यास त्याचा त्वचेला त्रास होत नाही. तुमच्या चेहऱ्याच्या रंगाला शोभतील असे कॉम्पॅक्ट निवडा. आधी लिक्विड फाऊंडेशन लाऊन मगच कॉम्पॅक्ट वापरा. फाऊंडेशन केवळ लिक्विड म्हणून काम न करता अ‍ॅस्ट्रिन्ग्जंट, मॉस्चरायझर आणि सनस्क्रीन म्हणूनही काम करते. पण यातही मॉइश्चरायझर जास्त प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक अशा काही निवडक प्रॉडक्ट्सचा विचार करा. त्यातही ड्राय स्किनची समस्या लक्षात घेऊन योग्य ते प्रॉडक्ट खरेदी करा.

दागिने निवडताना 

आपल्या पेहरावाला शोभतील असे दागिने खरेदी करा. साडीवर एखादा एथनिक लूक देणारा सेट घालू शकता. मंगळसूत्र मोठे असेल तर एखादा लहान सेटही खुलून येऊ शकेल. केस मोकळे सोडणार असाल आणि ड्रेस भरजरी असेल तर नुसते मोठे कानातलेही चालतील. हल्ली मोठ्या आकारातील झुमके किंवा मोठे कानातले घालण्याचा बराच ट्रेंड आहे. साडी आणि ड्रेसच्या पॅटर्नला शोभतील असे दागिने न विसरता घेऊन ठेवा. जेणेकरुन ऐनवेळी कपडे घातल्यानंतर त्यावर काय घालायचे हा प्रश्न पडणार नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Easy and important tips for diwali makeup
Show comments