Happy Holi 2020 : रंगपंचमी म्हटलं की रंगांची उधळणं. या दिवशी प्रत्येक जण विविध रंगामध्ये न्हाऊन निघतो. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकालाच हा दिवस आवडतो. त्यामुळे प्रत्येक जण अगदी उत्साहात हा दिवस साजरा करतात. पूर्वी रंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंगांचा वापर करत असतं. मात्र आता त्या नैसर्गिक रंगांची जागा केमिकलयुक्त रंगांनी घेतली आहे. त्यामुळे बऱ्याचदा रंग खेळल्यानंतर तो रंग चेहऱ्यावर, अंगावर तसाच राहतो. कितीही पाण्याचा, साबणाचा वापर केला तरी हा रंग जाता जात नाही. मात्र अशा काही घरगुती गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने रंग सहज काढता येऊ शकतो.
१. रंग खेळताना शक्यतो कोरड्या रंगाचा वापर करावा. कोरडे रंग वापरले असतील तर रंग काढणं सोपं पडतं. शरीरावरील कोरडा रंग साफ करायचा असल्यास एका मुलायम कपड्याने चेहऱ्यावरील आणि अंगावरील रंग झटकावा.
२. रंग कधीही काढताना हलक्या हाताने काढावा. तो जोरजोरात रगडून काढू नका. त्यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. तसंच त्वचेची आग होऊ शकते.
३. रंग काढण्यासाठी कधीही रॉकेल,कपडे धुण्याचा साबण यांचा वापर करु नका.
४. डाळीचं पीठ (बेसन) हे रंग काढण्यासाठी उत्तम पर्याय आहे. डाळीच्या पिठात लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण शरीरावर लावावं.
५.खोबरेल तेल किंवा दहीदेखील चेहऱ्यावर लावून रंग काढता येतो.
६ केसांमधील रंग काढण्यासाठी प्रथम केस पाण्याने धुवून घ्यावेत. त्यानंतर शॅम्पू लावावा.
७. शॅम्पूला पर्याय म्हणून बेसन, दही किंवा आवळ्याची पावडर पाण्यात एकत्र करून त्या पाण्याने केस धुवावेत. मात्र आवळ्याची पावडर लावण्यापूर्वी ती रात्रभर पाण्यात भिजवलेली असावी.
८. डोळ्यात रंग गेल्यास पाण्याने डोळे स्वच्छ करावेत.
९. रंग डोळ्यात गेल्यामुळे डोळ्यांची आग होत असेल तर पाण्यात गुलाबजल मिक्स करुन डोळ्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.