Easy Gardening Tips For Summer : मोगऱ्याची फुलं ही सुगंधामुळे अनेकांना फार आवडतात. त्यांचा आकार, रंग दिसायला फारच सुंदर वाटतो, त्यामुळे अनेक जण घराच्या बाल्कनीत, टेरेस गार्डनमध्ये आवडीने इतर फुलझाडांसह मोगऱ्याचं रोप लावतात. मोगऱ्याचे डबल मोगरा, बटमोगरा, मदनबाण, साधा मोगरा असे अनेक प्रकार आहेत. पण, तुम्ही कोणत्याही प्रकारचे मोगऱ्याचे रोप घरी आणल्यानंतर काही दिवसांनी त्याला फुलं येईनाशी होतात. झाडावर फक्त पानंच दिसू लागतात. मोगऱ्याच्या रोपाचा बहर अचानक कमी झाल्याने काय करावे समजत नाही. पण, काळजी करू नका. मोगऱ्याला भरपूर फुलं येण्यासाठी तुम्ही खालील कांद्याचा एक उपाय नक्की करून पाहू शकता.
कंटेंट क्रिएटर बबिता देवी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी मोगऱ्याला भरपूर फुलं येण्यासाठी कांद्याचा एक उपाय सांगितला आहे.
मोगऱ्याच्या रोपाला भरपूर फुलं येण्यासाठी सोपा उपाय (Easy gardening tricks for beginners)
१) कांद्याची साल
२) लिंबाची साल
३) एक कंटेनर
कांद्याच्या सालीपासून बनवा खत (How To Get Maximum Flowers In Mogra Plant)
सर्वप्रथम एक कांद्याची साल घ्या आणि ती एका कंटेनरमध्ये ठेवा. आता त्यात लिंबाची साल आणि पाणी मिसळून ते तीन दिवस तसेच राहू द्या. या दिवसांमध्ये तुम्ही दररोज हे मिश्रण ढवळत रहा, जेणेकरून दुर्गंधीची समस्या उद्भवणार नाही. तीन दिवसांनंतर कांदा आणि लिंबाची साल त्यातून बाहेर काढा. अशा प्रकारे मोगऱ्याच्या झाडासाठी तुमचं द्रव्य खत तयार होईल.
वापरायचे कसे?
हे तयार केलेले द्रव्य खत थेट मोगऱ्याच्या रोपाला टाकायचे नाही, तर ते तुम्हाला पाण्यात मिसळून पातळ करून टाकायचे आहे. दर आठवड्याला किंवा १० दिवसांनी एकदा हे द्रव्य खत मोगऱ्याच्या रोपांना घालू शकता, ज्यामुळे मोगऱ्याचं रोपं काही दिवसांत फुलांनी बहरेल.
मोगऱ्याच्या रोपाची अशाप्रकारे घ्या काळजी
१) मोगऱ्याच्या रोपाला दररोज किमान ५ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. रोपाला जितका जास्त थेट सूर्यप्रकाश मिळेल तितके ते निरोगी राहील.
२) जास्तवेळ सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतरही ते झाड सुकण्याचा धोका असतो, त्यामुळे माती कोरडी दिसू लागताच त्याला पाणी द्या.
३) मोगऱ्याच्या रोपाची वर्षातून एकदा छाटणी करा. डिसेंबर महिना यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
४) मोगऱ्याचं रोप १५-३५ अंश सेल्सिअस तापमानात चांगलं वाढतं, म्हणून उन्हाळ्याचे दिवस त्यासाठी योग्य मानले जातात.