थंडीचे दिवस आले की घशाची खवखव ठरलेलीच. मग ऑफीसला गेलो किंवा कुठे बाहेर गेलो तरी इरिटेशन होत राहतं. उगाचच आजारी असल्याचा फिल येत राहतो. बोलताना, खाताना त्रास होतो. आता वातावरण बदललल्याने शरीरावर त्याचे काही ना काही परिणाम तर होणारच. त्यातही इतक्या लहान तक्रारीसाठी डॉक्टरांकडे कशाला जायचे म्हणून आपण ती गोष्ट अंगावर कढतो. पण असे अंगावर काढल्यास त्या त्रास होऊ शकतो. त्यामुळे या समस्येसाठी काही घरगुती उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. पाहूयात अगदी सहज करता येतील असे सोपे आणि घरगुती उपाय….
वाफ घ्या
थंडीमध्ये घशाचे इन्फेक्शन होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. याच्या जोडीला येणारा ताप, सर्दी यामुळे आपण हैराण होऊन जातो. पण वाफ घेणे हा यारील सोपा उपाय आहे. घरच्या घरी गरम पाणी करुन त्याची वाफ घेतल्यास घशाला आराम पडतो. दिवसातून दोन ते ती वेळा हे केल्यास इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते.
गुळण्या करा
सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे गेल्यास तेही औषधांबरोबर गुळण्या करायला सांगतात. कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने त्याचा निश्चित फायदा होतो. इतकेच नाही तर ऑफीसमध्ये किंवा बाहेर असल्यास कोमट पाणी आणि मीठ शक्य नसले तर साध्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे घसा मोकळा व्हायला मदत होते.
गरम पेय फायदेशीर
घसा दुखत असल्यास काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. अशावेळी गरम चहा, कॉफी किंवा सूप प्यायल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. चहामध्ये तुळस, लवंग, आले घातल्यास घशासाठी तो जास्त उपयुक्त होतो. असा चहा दिवसातून २ वेळा घेतला तरी घशाला आराम मिळतो.