तुमच्यापैकी अनेकजण कट्टर ‘चीज’प्रेमी असतील. एक्स्ट्रा चीजशिवाय खवय्यांचं तर पानच हलत नाही. कित्येक जण आपल्याला या चीज प्रेमात आकंठ बुडालेले दिसतात. पण एक्स्ट्रा चीज खाल्लं कि वजनही एक्स्ट्राच वाढतं या भितीने अनेक जण आपल्यावर मनावर आणि जिभेवर ताबा ठेवतात. पण आता “चीज खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता” असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर? विश्वास ठेवाल? पण होय, हे खरंय. आरोग्यविषयक तज्ञांच्या मते, आपल्या आहारात योग्य चीजचा समावेश केल्याने आपलं संपूर्ण आरोग्य सुधारण्यास, स्नायू-हाडं मजबूत करण्यास आणि वजन कमी करण्यास मोठी मदत होते.चीज खाल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती आणि स्नायूंची ताकद वाढते. इतकंच नव्हे तर तुमचं वजन कमी होण्यास देखील मदत होते. पण यात एक छोटी अट अशी कि, यासाठी तुम्हाला योग्यच चीज खावं लागेल. बाजारात चीजचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. मग, त्यात आपल्या शरीरासाठी योग्य चीज कसं निवडाल? चला आम्ही मदत करतो. लगेच, जाणून घेऊया आपल्या शरीरासाठी कोणतं चीज योग्य आणि हेल्थी आहे?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्ल्यू चीज

ब्ल्यू चीजबद्दल तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल. ब्ल्यू चीज हे शरीरासाठी अत्यंत उत्तम मानलं जात. या चीजचा आपल्या आहारात समावेश केल्याने आपल्याला मुबलक प्रमाणात प्रथिनं मिळू शकतात. १ कप ब्लू चीजमध्ये सुमारे २९ ग्रॅम प्रथिनं असतात. ब्लू चीज वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता. उदा. विविध भाज्या, फळं यांसह सँडविचमध्ये योग्य प्रमाणात केलेला ब्ल्यू चीजचा समावेश तुम्हाला तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत करू शकतं. ब्लू चीज हे गाय, शेळी किंवा मेंढीच्या दुधापासून पेनिसिलियमच्या पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं. या चीजला एक विशिष्ट चव आणि सुगंध असतो. आपल्या दैनंदिन आहारात एक कप ब्लू चीजचा समावेश केल्याने आपल्या शरीराला कॅल्शियमच्या रोजच्या गरजेच्या ३३ टक्के भाग मिळू शकतो. हे चीज आपल्या हाडांची घनता आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत करतं.

पार्मेसान चीज

ब्लू चीजसोबतच आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी ठरणाऱ्या आणखी एका चीजचं नाव आहे पार्मेसान चीज. पार्मेसान चीज हे पास्तासह, कोणत्याही मांसाहारी पदार्थांला एक अप्रतिम अशी चव देतं. त्याचसोबत, फक्त १ कप चीजमध्ये ३८ ग्रॅम प्रथिनं असतात. म्हणूनच पार्मेसान चीज हा प्रथिनांचा स्त्रोत आहे. या चीजची विलक्षण चव तुमच्या जिभेला खुश तर करतेच पण त्याचसोबत हे चीज तुमचं वजन नियंत्रणात राखण्यास देखील मदत करतं, स्नायूंना बळकटी देतं, हाडांचं आरोग्य वाढवतं आणि एकूणच आपली प्रतिकारशक्ती वाढवतं. अनपॅश्चराइज्ड गाईच्या दुधापासून बनवलेलं हे चीज चवीला खारट असतं. अभ्यासानुसार, या पार्मेसान चीजमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं. विशेष म्हणजे हे चीज कडक असतं आणि बनवल्यानंतर तब्बल १२ महिन्यांच्या मोठा काळापर्यंत ते खाता येतं नाही. १२ ते १३ महिन्यानंतर ते खाण्यायोग्य होतं. तोपर्यंत ते तसंच सेट केलं जातं.

मॉझरेला चीज

मॉझरेला चीज हा चीजचा एक अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. आपल्या पिझ्झाला एक उत्तम आणि परिपूर्ण असा लेयर देण्यापासून स्टफ्ड चिकन, फिश, ब्रेड आणि अशाच असंख्य पदार्थांची चव वाढवण्यासाठी मॉझरेला चीजपेक्षा उत्तम असा दुसरा कोणताही पर्याय नाही, असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे, हे चीज शरीरासाठी उत्तम मानलं जातं. गाईच्या किंवा इटालियन म्हशीच्या दुधातील सर्वोत्तम गुणांमधून हे चीज तयार होतं. सर्वप्रथम इटलीच्या बायलेन्समध्ये मॉझरेला चीज बनवण्यात आलं आणि आता ते जगभरात  चांगलंच प्रसिद्ध झालं आहे.

१ कप मॉझरेला चीजमध्ये अंदाजे ३६ ग्रॅम प्रथिनं असतात. सोडियमचं प्रमाण कमी असल्याने हे चीज इतर चीज प्रकारांपेक्षा अधिक चांगलं ठरतं. यामधील प्रोबायोटिक्स आपली पचनशक्ती आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. विविध भाज्या, सॅलड्स, मांस, मासे यांपासून बनवण्यात येणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये आपण मॉझरेला चीजचा वापर करू शकतो.

फेटा चीज

अगदी मऊ, लुसलुशीत, काहीसं खारट आणि पांढरं शुभ्र असं फेटा चीज हे अत्यंत हेल्थी चीज प्रकारांपैकी एक आहे. विविध प्रकारची सॅलड्स, मांसाहारी पदार्थ किंवा सँडविचमध्ये आपण याचा समावेश करू शकतो. फेटा चीज मूळचं ग्रीसमधील आहे. हे चीज मेंढीच्या दुधापासून पारंपारिकरित्या तयार केलं गेलं आहे. फेटा चीज बनवण्यासाठी वर्षानुवर्षे शेळीच्याच दुधाचा वापर केला जातो. आरोग्य तज्ञांच्या मते, साधारणतः १ कप फेटा चीजमध्ये सुमारे २१ ग्रॅम प्रथिनं असतात. फेटा चीज हे संपूर्ण फुलफॅट दुधापासून  बनवलं जातं. यातील Conjugated Linoleic Acid शरीराचं वजन कमी करण्यासह शरीराची रचना सुधारण्याशी संबंधित आहे.

रिकोटा चीज

रिकोटा चीज हे क्रीमयुक्त किंवा क्रीमसारखं दिसणारं इटालियन चीज आहे. हे चीज गाय, शेळी, मेंढी किंवा इटालियन म्हशीच्या दुधापासून बनवलं गेलं आहे. आरोग्यप्रेमींमध्ये हे चीज अत्यंत प्रसिद्ध आहे कारण ह्यात प्रथिनांचं प्रमाण भरपूर आहे. सुमारे १ कप रिकोटा चीजमध्ये २८ ग्रॅम प्रथिनं असतात. रिकोटा चीजमध्ये दुधातील अमीनो ऍसिडचं प्रमाण मुबलक असतं. रिकोटा चीज देखील आपल्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी उत्तम ठरतं. इतकंच नव्हे तर ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील मदत करतं.

कॉटेज चीज (पनीर)

कॉटेज चीज किंवा पनीर हा चीजचा हेल्थी प्रकार तुम्हाला माहीतच असेल. पनीर कॅल्शियमचा एक मोठा स्त्रोत आहे. पनीर हाडांचं आरोग्य मजबूत करण्यास खूप मदत करतं. सोबतच हे चीज आपल्या आहारात समाविष्ट केल्याने मनंही तृप्त होतं आणि हळूहळू वजन कमी करण्यास मदत होते. आपण आपल्या आहारात विविध मार्गांनी पनीरचा वापर करू शकतो. सूप, करी, सॅलड्स, रोल आणि स्मूदीजमध्ये पनीरचा वापर केला जातो

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eat cheese lose weight these are 6 best options gst