Food For Good Skin : प्रत्येकाला असं वाटतं की, आपली त्वचा सुंदर दिसावी. अनेक जण सुंदर त्वचेसाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात, पण काहीही फायदा होत नाही. असं म्हणतात, उत्तम आहार हा त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर असतो; पण तुम्हाला माहिती आहे का चांगल्या त्वचेसाठी फायबरयुक्त आहार घेणे खूप गरजेचे आहे. आज आपण त्या विषयीच जाणून घेऊ या.
न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चांगल्या त्वचेसाठी कोणता फायबरयुक्त आहार घ्यावा, याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.
अंजली मुखर्जी यांनी सांगितल्याप्रमाणे-
१. गव्हाच्या पीठामध्ये गव्हाचा कोंडा एकत्र करावा. या पीठाच्या पोळ्या खाणे चांगले आहे.
२. मैद्याचे पदार्थ, केक, वेफर्स, चटपटीत पदार्थ, पाव याऐवजी फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. फळे, भाज्या आणि धान्यांचे सेवन करावे. यामुळे त्वचेवरील पुरळ किंवा लालसरपणा दूर होतो.
३. हिरवा भाजीपाला जसे की मेथी, पालक, मुळ्याची पाने, मोहरीची पाने आणि मोड आलेल्या कडधान्यांमध्ये न्यूट्रीअंट्सचे प्रमाण अधिक असतात. गाजराचा आणि कोथिंबीरचा ज्यूस अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे.
४. अननस, द्राक्षे, टरबूज, पपई, जांभूळ आणि नाशपाती खा. या फळांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.
अंजली मुखर्जी यांनी त्यांच्या anjalimukerjee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती शेअर केली असून या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्हाला माहिती असेल की चांगल्या त्वचेसाठी तुम्हाला चांगला आहार घेणे गरजेचे आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे का, फायबर त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. नियमित फायबरचे सेवन केल्यामुळे तुमच्या त्वचेवर चांगले परिणाम दिसू शकतात.”
अंजली यांच्या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी अंजली यांना या संदर्भात प्रश्नसुद्धा विचारले आहेत.