Eggs Benefits In Winter: सर्वात पौष्टिक पदार्थांमध्ये अंड्यांची गणना केली जाते. एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. अंडे हे प्रोटीनचे मोठे स्त्रोत आहे. अंड्याला वेगवेगळ्या पध्दतीने बनवले जाते. उकडलेल्या अंड्यात हेल्दी फॅट असते. जे वजन वाढू देत नाही. अंड्यात असलेले व्हिटामिन डी सर्दी पासून बचाव करते. नियमित एक अंडे उकडून खाल्याने रोगप्रतीकार शक्ती वाढण्यास मदत करतात. याचा फायदा त्वचा, डोळे आणि केसांना होतो. हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी पडायला लागते. शरीरातील उर्जा कमी होत जाते. अशावेळी हेल्दी फूड खाणे गरजेचे असते. आजकाल जगभरातील डॉक्टर लोकांना आहारात अंड्यांचा समावेश करण्यास सांगतात. त्यासाठी, रोज एक किंवा दोन अंडी खाणे अगदी योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुम्ही उकडलेली अंडी हा पर्याय वापरू शकता. उकडलेली अंडी खाण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊया.
अंड्यात असणारे घटक
एका उकडलेल्या अंड्यातून ७७ कॅलरीज मिळतात. याशिवाय यात ०.६ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ५.३ ग्रॅम फॅट, १.६ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट, २ ग्रॅम मोनोसॅच्युरेटेड फॅट, २१२ मिलीग्राम कोलेस्टेरॉल, ६.३ ग्रॅम प्रोटीन, ६ टक्के व्हिटॅमिन ए, १५ टक्के व्हिटॅमिन बी २, नऊ टक्के व्हिटॅमिन बी१२, ७ टक्के व्हिटॅमिन बी ५, ८६ मिलीग्राम फॉस्फरस आणि २२ टक्के सेलेनियम आढळतात. हिवाळ्यात शरीरातील आतील तापमान वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो.
(आणखी वाचा : पांढरा किंवा तपकिरी? कोणत्या रंगाचे अंडे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर; वाचा तज्ज्ञांचा सल्ला )
हिवाळ्यात उकडलेली अंडी खाण्याचे फायदे
रोगप्रतिकारशक्ती वाढते
रोज एक उकडलेलं अंडं खाल्ल्यानं शरीर मजबूत राहतं. अंड्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि अनेक पोषक घटक असतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी ते सर्व प्रभावी असतात.
लोह
जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर अंडी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण अंडी केवळ प्रोटीनच नाही तर लोहाचाही चांगला स्रोत मानला जातो. अंड्याच्या सेवनाने लोहाची कमतरता दूर करता येते.
डोळे आणि मेंदू
अंड्यांमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंटस डोळ्यांच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. अंड्यांमध्ये कोलीन हे रसायन आढळतं. ते मज्जासंस्था मजबूत करणं आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतं. अंड्यातील ‘अ’ जीवनसत्त्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं.
(आणखी वाचा : Piles home treatment: मूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरेल ‘हा’ उपाय; जाणून घ्या एका क्लिकवर )
सर्दी
थंडीच्या दिवसात सर्दीची समस्या ही सर्वसामान्य समस्यांपैकी एक आहे. हिवाळ्यात रोज अंडी खाल्ल्याने सर्दी टाळता येते. कारण अंड्यामुळे शरीराला उबदार ठेवता येते.
हृदयाचे आरोग्य
अंड्यामध्ये भरपूर कोलेस्टेरॉल असते परंतु ते डायटरी कोलेस्टेरॉल असल्याने ते हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक नसते. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही. यामुळेच अंड्यांमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.