रोजच्या रोज मूठभर सुकामेवा खाणा-यांमध्ये ३० वर्षात कोणत्याही आजाराने मरण्याच्या शक्यतेत २० टक्क्यांनी घट झाल्याचे एका संशोधनात आढळले आहे. ज्यांचे सुकामेवा खाण्याचे प्रमाण अगदीच कमी असते त्यांच्यापेक्षा खाणा-यांच्या मृत्युदरात घट झाल्याचे परीक्षणातून जाणवले. या परीक्षणात मृत्यूच्या ठराविक कारणांवर होणारा संरक्षणात्मक प्रभावही पडताळण्यात आला आहे.
अमेरिकी संशोधकांच्या एका पथकाने एक लाख २० हजार व्यक्तींवर तब्बल ३० वर्षे अभ्यास केला. त्यापैकी सुकामेवा खाणा-या व्यक्तींचा मृत्युदर २० टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास आले. सुकामेवा खाल्ल्याने हृदयविकारामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण २९ टक्क्यांनी कमी झाले आहे, तर कर्करोगामुळे होणारे मृत्यूही ११ टक्के कमी झाले आहेत, असे निरीक्षण डाना-फॅबर कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि ब्रीगम अॅण्ड वूमन्स रुग्णालयाचे मुख्य संशोधक डॉ. चार्ल्स फच यांनी नमूद केले. मात्र, सुकामेव्यातील कोणत्या प्रकारचा किती संरक्षणात्मक प्रभाव पडू शकतो हे अद्याप निर्धारित करता आलेले नाही. शेंगदाणे आणि काजूंचा आयुर्मानात वाढ होण्यात चांगल्या प्रमाणात प्रभाव होतो. पण, त्याचबरोबर अक्रोड, बदाम, ब्राझीलियन बदाम, अंजीर यांचाही ब-या प्रमाणात संरक्षणात्मक प्रभाव पडतो. मात्र, त्याचे निश्चित प्रमाण कळू शकलेले नाही.

Story img Loader