सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि कामाच्या तणावामुळे शांतपणे जेवणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे काहीजण काम करता करता जेवतात. २१-३० वयोगटातील सुमारे ७५% व्यक्ती हे दिवसाचे १० तास विश्रांती न घेता काम करत राहतात. पण, तुम्ही जर असे करत असाल तर ते टाळा. कारण जेवणासाठी ब्रेक न घेतल्यास काम करत जेवल्यामुळे डीप व्हेन थंबोसिस(DVT) हा आजार होण्याची शक्यता अधिक प्रमाणात वाढते. डीव्हीटीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत जातात.
एका नव्या परीक्षणानुसार, डीव्हीटीमुळे मरणा-यांच्या संख्येत वाढ होत असून यातील बहुसंख्य लोक चाळीसच्या आतील वयोगटातले आहेत. २००७ साली डीव्हीटीने मरण पावणा-यांची संख्या ६७ होती. आता यामध्ये ४० टक्क्यांपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. या आजारामुळे धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात आणि फुप्फुसांपर्यंत रक्तपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात. तसेच, हा आजार झालेल्या रुग्णांवर काहीवेळा उपचारांचाही प्रभाव होत नाही.
तज्ज्ञांच्या मते डीव्हीटीपासून बचाव करण्यासाठी सतत हालचाल करण्याची गरज आहे. एकाच जागी बसून न राहता थोडावेळ चालणे, अतिरिक्त वजन कमी करणे तसेच धूम्रपान कमी करण्याची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त आहारातील मिठाचे प्रमाण कमी केल्यासही याचा धोका टाळता येऊ शकतो.