Digestion & Constipation Remedies: ज्याचं पोट स्वच्छ त्याचे विचार आणि आचार स्वच्छ असं आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवलं आहे. पोट स्वच्छ असल्यास शरीर आजारातून अधिकाधिक मुक्त राहू शकतं परिणामी तुमची चिडचिड, राग कमी होऊन मन सुद्धा शांत होतं. अलीकडे खाण्यापिण्याच्या वेळांचा ताळमेळ बिघडल्याने आणि शरीरापेक्षा मनाचीच जास्त शक्ती वापरात आल्याने अनेकांना अपचनासाखे त्रास होऊ लागले आहेत. बद्धकोष्ठ सारखा त्रास तर सगळ्याच वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. आज आपण याच बद्धकोष्ठ म्हणजे सोप्या भाषेत पोट स्वच्छ न होण्याच्या त्रासावर सोपा आणि स्वस्त उपाय पाहणार आहोत.
शरीराचा हा नियम माहित आहे का?
जगप्रसिद्ध सद्गुरू यांनी आपल्या एका कार्यक्रमात शरीराच्या कार्यप्रणालीविषयी सुद्धा भाष्य केले होते. जर सकाळी झोपेतून उठल्यावर पहिल्या २० मिनिटात तुमचे पोट स्वच्छ होत नसेल तर याचा अर्थ तुम्ही पाचनप्रक्रियेकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला ही माहित असेल की पाचनप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा हा आतड्यांमध्ये असतो. जेव्हा शरीरातून टाकून द्यायचे घातक घटक आतड्यांमध्ये जमा होऊ लागतात तेव्हा त्यातूनच अन्य अनेक आजारांना आमंत्रण मिळते. अगदी तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीपासून ते मानसिक अस्वास्थ्यापर्यंत अनेक त्रास यातून उद्भवतात. आज आपण यावरील आयुर्वेदिक उपाय पाहू.
सकाळी उठून तुम्ही आधी काय खाताय?
तुम्हाला जर आयुर्वेदिक पद्धतीने तुमच्या आतड्यांची स्वच्छता करायची असेल तर तुम्ही सकाळी उठल्यावर शरीराला द्रव पदार्थ उपलब्ध करून द्यायला हवे. म्हणूनच गरम पाणी, मध, मनुके अशा गोष्टींचे सेवन सकाळी करणे लाभदायक मानले जाते. याशिवाय आपल्याला अगोदरच काहीप्रमाणात बद्धकोष्ठचा त्रास असेल तर आपण काही अंशी चिकट किंवा स्निग्ध पदार्थांचे सेवन करायला हवे. जसे की खोबरेल तेल किंवा तूप. मात्र, जर तुमचा बद्धकोष्ठचा त्रास भरपूरच असेल तर तुम्हाला पदार्थाची स्निग्धता वाढवणे गरजेचे आहे. अशावेळी एक चमचा एरंडेल तेल पिण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात.
हे ही वाचा<< मोठी बातमी! जगात पहिल्यांदा कॅन्सरवर अवघ्या सात मिनिटांत उपचार शक्य; ‘या’ ठिकाणी होणार सुरुवात
तेलाचे सेवन कसे व किती करावे?
एरंडेल तेलाचे सेवन आपण महिन्यातून फार फार तर तीन चमचे इतकेच करावे अन्यथा पोट बिघडू शकते. या तेलाची चव व गंध खूप उग्र असतो त्यामुळे मळमळ सुद्धा जाणवू शकते म्हणून तेलाचे सेवन करताना पाणी सुद्धा जवळ ठेवावे. तेलामुळे आतड्यांमधून चिकटून राहिलेले घातक पदार्थ वाहते होतात आणि पोट साफ होण्यास मदत होते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या)