जीआरई- टॉफेलची परीक्षा देऊन परदेशांतील विद्यापीठांत एमबीए, इंजिनिअरिंग किंवा वैद्यक शास्त्रातील उच्च शिक्षणासाठी जायचं आणि तिथल्या विद्यापीठांची शैक्षणिक फी भरता यावी, यासाठी शैक्षणिक कर्ज घ्यायचं, इतकीच माहिती आजवर मराठी पालक-विद्यार्थ्यांना होती. पण आता हळूहळू ‘चौकटीबाहेर’च्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी परदेशांत जाणा-यांची संख्या वाढू लागली आहे. आणि विशेष म्हणजे, अशा चौकटीबाहेरच्या अभ्यासक्रमांनाही शैक्षणिक कर्ज उपलब्ध होऊ लागले आहे.
रोबोटिक्स, अप्लाइड सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इतकंच काय स्पोर्ट्स मॅनेजमेंट, संगीत तंत्रज्ञान, फोटोनिक्स, इमेज कन्सल्टिंग यांसारख्या काहीशा ‘हटके’ अभ्यासक्रमांसाठी भारतीय विद्यार्थी आता परदेशांत जाऊ लागले आहेत. अशा प्रकारचे अभ्यासक्रम शिकवणारी विद्यापीठं किंवा शैक्षणिक संस्था भारतात अत्यल्प आहेत, आणि ज्या आहेत त्या अद्याप नावारूपाला आलेल्या नाहीत. युरोप आणि विशेषत: अमेरिकेत मात्र असे ‘हटके’ अभ्यासक्रम शिकवणा-या अनेक नावाजलेल्या शैक्षणिक संस्था- विद्यापीठं असून इंटरनेटच्या प्रसारामुळे भारतीय विद्यार्थ्यांनाही आता त्याबाबत सहज माहिती उपलब्ध होऊ लागली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ऑक्झिलो फिनसर्वचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक नीरज सक्सेना म्हणाले, “पूर्वी आपल्याकडे फक्त ठराविक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच शैक्षणिक कर्ज उपलब्ध होत असे. पण आता बदलत्या काळाची पावलं ओळखत शैक्षणिक कर्ज देणा-या वित्तीय संस्था रोबोटिक्स, स्पोर्ट्स मॅनेजमेंट किंवा म्युझिक टेक्नालाजी अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनाही कर्ज उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस परदेशातील अशा हटके अभ्यासक्रमांना प्रवेश घेणा-या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.”
शैक्षणिक कर्ज घेणारा विद्यार्थी जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागतो, तेव्हा तो त्याचं कर्ज हप्त्याहप्त्याने फेडतो. शैक्षणिक कर्जाचा एक फायदा असा की, ते फेडताना आकर्षक असे टॅक्स बेनिफिट्स मिळतात. भारतात असे अभ्यासक्रम अद्याप म्हणाव्या तितक्या प्रमाणात सुरू झाले नसले, तरी परदेशात असे वेगवेगळे अभ्यासक्रम चालविणा-या अनेक शैक्षणिक संस्था आहेत, आणि त्या संस्थांमधून अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणारे विद्यार्थी खूप चांगले अर्थार्जन करत आहेत, असंही नीरज सक्सेना यांनी सांगितलं.
सर्वसाधारण शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी ज्याप्रकारे अर्ज केला जातो, त्याप्रकारेच अशा विशेष अभ्यासक्रमांसाठीचे शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. कर्ज देणा-या संस्थांच्या वेबाइटवर जाऊन विद्यार्थी अर्ज भरू शकतात. विद्यार्थ्याचा अर्ज, प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती, शैक्षणिक कागदपत्रे आणि संबंधित वित्तीय माहिती भरल्यानंतर त्याची शहानिशा करून पात्रता निकषांनुसार या संस्था कर्ज देतात.