Home Remedies for Cockroaches at Home: झुरळांचा त्रास हा प्रत्येक घरात सर्वांनाच होतो आणि हा त्रास अतिशय वैताग देणारा असू शकतो. घरात एकदा झुरळांचा शिरकाव झाला की, मग ती अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीत. मग काय झुरळे घरातील फर्निचर, कपाट, बेड, दरवाजे, खिडक्यांवर बिनदिक्कतपणे फिरताना दिसतात. स्वयंपाकघरात खरकटी भांडी, अन्नकण पडलेले असले की, लगेच झुरळं तयार होतात. मग कितीही स्वच्छता ठेवूनही झुरळांचा स्वयंपाकघरातला वावर वाढतच जातो. हे आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. झुरळांमुळे अन्न दूषित होऊन पोटाचे आजार होऊ शकतात. झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती वस्तूंचा वापर करून करता येणारे उपाय उत्तम आहेत. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला कसलाच खर्च करावा लागणार नाही. खालील सोप्या उपायांद्वारे झुरळांना कसे पळवून लावायचे ते जाणून घ्या…
झुरळे घालवण्याचे घरगुती सोपे उपाय
तमालपत्र
जेवणाची चव वाढवणारे तमालपत्र तुमच्या घरातून झुरळे काढून टाकण्यासही मदत करू शकते. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी या पानांची पावडर तयार करा आणि जिथे झुरळांचा जास्त वावर असतो अशा स्वयंपाकघराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवा. तमालपत्राच्या वासाने घराच्या कानाकोपऱ्यात लपलेली सर्व झुरळे पळून जातील.
बोरिक पावडर
झुरळांना मारण्यासाठी बोरिक पावडर खूप फायदेशीर आहे. त्यामुळे बाजारातून बोरिक अॅसिड पावडर आणून. एक चमचा बोरिक पावडर, दोन चमचे गव्हाची कणीक आणि थोडेसे दूध मिसळून, त्याचे छोटे गोळे बनवा. हे गोळे झुरळे ज्या भागात असतील तिथे ठेवा. हा उपाय सातत्याने केल्यास झुरळांची संख्या हळूहळू कमी होईल.
लवंग
जेवणात सुगंध निर्माण करणारी लवंग झुरळांची शत्रू आहे. झुरळांना कायमचे घालवण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. झुरळांच्या ठिकाणांजवळ काही लवंगा ठेवाव्यात. लवंगाचा वास येताच झुरळे पळून जातील.
बेकिंग सोडा
किचनमध्ये ठेवलेला बेकिंग सोडा तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये अर्धा चमचा साखर मिसळून झुरळे ज्या ठिकाणी प्रवेश करतात, त्या जागेवर टाका. असे केल्यास झुरळांपासून तुमची सुटका होऊ शकते.
कडुलिंब
कडुलिंबाच्या तीव्र वासाने झुरळांसह अनेक प्रकारचे कीटक घरापासून दूर ठेवण्यास मदत मिळते. जर तुमच्या घरात झुरळांचा उपद्रव वाढला असेल, तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाचे तेल किंवा पावडर वापरू शकता. जिथे झुरळे आहेत, त्या ठिकाणी तेल शिंपडून ठेाव.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)