अंडी सेवनाने टाइप-२ मधुमेही आणि इतरांच्या हृदयाची हानी होते हा समज खरा नसून त्यामुळे कुठलेही दुष्परिणाम होत नसल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचा वाद संपुष्टात आणताना सांगितले की, अंडी सेवन करण्यात कुठलाही धोका नाही. आठवडय़ाला बारा अंडी खाण्याने मधुमेहाची पूर्वपीठिका असलेल्यांच्या हृदयाची हानी होत नाही. अमेरिकन जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या शोधनिबंधानुसार यापूर्वीही तीन महिन्यांच्या संशोधनात असेच निष्कर्ष काढण्यात आले होते. यात सहभागी व्यक्तींचे दोन गट करून एका गटास आठवडय़ाला १२ अंडी तर दुसऱ्या गटास आठवडय़ाला दोनपेक्षा कमी अंडी देण्यात आली पण त्यांच्या हृदयाच्या आरोग्यात कुठलाही फरक पडला नाही. जोखीम दिसून आली नाही. या व्यक्तींना वजन कमी करण्यासाठीच्या आहारावर तीन महिने ठेवण्यात आले त्यात त्यांना कमी-जास्त प्रमाणात अंडी देण्यात आली. यात पुढील सहा महिने त्यांना बारा अंडय़ांपर्यंत आहार देण्यात आला. त्यात त्यांच्या  हृदयाच्या आरोग्याला कोणताही धोका दिसून आला नाही, असे सिडनी विद्यापीठाचे निक फ्युलर यांनी म्हटले आहे. टाइप दोन मधुमेह असलेल्यांनी अंडी सेवन करू नये त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो हा समज होता. तो खरा नसून त्यांनी अंडी खाण्यास हरकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी बटरऐवजी अ‍ॅव्होकॅडो आणि ऑलिव्ह तेलाचा वापर करावा असे सुचवण्यात आले आहे. अंडय़ात आहारात्मक कोलेस्टेरॉल जास्त असते आणि टाइप-२ मधुमेहींसाठी एलडीएल (वाइट-लो डेन्सिटी लिपोप्रोटिन) कोलेस्टेरॉल घातक असते पण टाइप दोन मधुमेहींनी अंडीसेवन केल्याने त्यांच्या रक्तातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे दिसून आले नाही. अंडय़ात प्रथिने आणि सूक्ष्मपोषके असतात. त्यातून आरोग्यास मोठा फायदा होतो, त्यामुळे कबरेदके आणि मेदाचे नियंत्रण होऊन डोळे, हृदय यांचे आरोग्य राखले जाते. अंडी सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये तीन महिन्यांनंतर वजन घटलेले दिसून आले, असा दावा संशोधनात करण्यात आला आहे.

Story img Loader