आजकाल वजन कमी करणे ही सोपी गोष्ट राहिलेली नाही. व्यस्त जीवनशैली आणि अयोग्य खानपान यामुळे वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनलेली आहे. मात्र यामुळे मधुमेह, हृदयविकार यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. जिममध्ये व्यायाम करणे, उपवास करणे यासारख्या गोष्टी केल्यानंतरही अनेकांना आपले वजन कमी करण्यात अपयश येते. मात्र अशा लोकांसमोर जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी जिममध्ये न जाताही तब्बल नऊ किलो वजन कमी केले आहे. त्यांनी ट्वीट करून यासंबंधी माहिती दिली आहे.
मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, जीवनशैलीतील योग्य बदल आणि इंटरमिटंट फास्टिंगच्या माध्यमातून त्यांनी अतिशय वेगाने आपले वजन कमी केले आहे. काही काळापूर्वी मस्क यांना त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांनी स्वतःवर मेहनत घेऊन नऊ किलो वजन कमी केलं आहे. तसेच, वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या लोकांना मस्क यांनी काही टिप्सही दिल्या आहेत. या टिप्सचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात केल्यास अगदी सहज वजन कमी करता येऊ शकते.
इलॉन मस्क म्हणतात, मी जीवनशैलीत काही बदल करून आणि इंटरमिटंट फास्टिंग करून काही वेळात नऊ किलोपर्यंत वजन कमी करू शकलो. यामध्ये त्यांनी झिरो फास्टिंग अॅपची मदत घेतली आहे. या अॅपद्वारे अन्न सेवनाचा मागोवा घेणे आणि त्याचे रेकॉर्ड ठेवणे उपयुक्त ठरते, असे त्यांनी सांगितले आहे. मस्क म्हणतात की वजन कमी करणे ही काही मोठी गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येत काही सोपे बदल करावे लागतील. यामध्ये इंटरमिटंट फास्टिंग करणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय?
इंटरमिटंट फास्टिंगमुळे अगदी सहजपणे वजन कमी करण्यास मदत मिळू शकते. यामध्ये काही महिन्यांसाठी दररोज थोड्या कालावधीसाठी उपाशी राहायचे असते. हे अनेक प्रकारे केले जाऊ शकते. काहीजण ‘अल्टर्नेट डे फास्टिंग’ही करतात. यामध्ये एक दिवस सामान्य आहार आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण उपवास किंवा अतिशय हलका आहार घेतला जातो. वजन कमी करण्यासाठी जगभरात ही पद्धत वापरली जात आहे.
आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर
आरोग्य तज्ञ सांगतात, इंटरमिटंट फास्टिंग केल्याने वजन कमी करण्याबरोबरच इतर अनेक प्रकारचे आरोग्य फायदे होऊ शकतात. वजन कमी करणे आणि शारीरिकरित्या सक्रिय राहिल्याने मधुमेह, स्लीप एपनिया आणि काही प्रकारचे कर्करोग अशा लठ्ठपणा-संबंधित रोगांचा धोका कमी होतो. रोजच्या कॅलरीज कमी करणे हा या उपवासाचा मुख्य उद्देश आहे.
आहारातील चवळीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? अनेक गंभीर आजारांवर आहे प्रभावी
वजन कमी करण्यास उपयुक्त
अभ्यासात असे आढळून आले आहे की इंटरमिटंट फास्टिंग करणे हा वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग असू शकतो. यामध्ये उपवासाची पद्धत आपोआप कॅलरीज कमी करण्यास मदत करू शकते. इंटरमिटंट फास्टिंग केल्याने तुमचे वजन कमी करण्यास मदत करणारे हार्मोन्स वाढण्यास मदत होते. इन्सुलिनच्या पातळीवर विशेष प्रभाव टाकून मधुमेहासारख्या समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे.
तथापि, जर तुम्हाला आधीच कोणत्याही आरोग्याच्या समस्येने ग्रासले असेल आणि तुम्ही औषधोपचार घेत असाल, तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच इंटरमिटंट फास्टिंग करा.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)