ब्रिटनमधील संशोधन
स्मार्टफोनवरचे ई-मेल बंद करणे हा सुखाचा एक मार्ग आहे, कारण तसे केल्यास मानसिक ताण कमी होतो, असे नवीन संशोधनातून दिसून आले आहे. ज्यांच्या स्मार्टफोनवर आपोआप ई-मेल स्वीकारले जातात, त्यांच्यासाठी ती एक डोकेदुखी असते, कारण ते पाहावे लागतात व त्यातून ताण येतो; त्याला ‘ईमेल प्रेशर’ असे म्हटले जाते.
१९७० मध्ये प्रथम ई-मेलची सुरुवात झाली, त्यानंतर त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढतच गेला. झटपट संदेशवहनासाठी ई-मेल हे उपयोगी साधन आहे, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींसाठी तर त्याचे महत्त्व अधिक आहे, शिवाय व्यक्तिगत वापरही मोठा आहे. काही व्यावसायिकांच्या मते ई-मेल हे संदेशवहनाचे लोकप्रिय साधन असले तरी त्यामुळे नैराश्य येते, कामातील उत्पादकता कमी होते. ई-मेलची संख्या सतत वाढतच जाते आणि ते पाहण्यात वेळ जातो, त्यामुळे मूळ काम बाजूला राहते.
ई-मेलबाबत संशोधन करताना ब्रिटनमधील फ्यूचर वर्क सेंटर या संस्थेने व्यवसाय, उद्योग व इतर नोकरी अशा क्षेत्रांतील दोन हजार लोकांची पाहणी केली. त्यात असे दिसून आले की, तंत्रज्ञान, नोकरी-व्यक्तिगत जीवन यांचा समतोल, व्यक्तिमत्त्व यावर ई-मेलमुळे परिणाम होत असतो. जे लोक आपोआप ई-मेल स्वीकारणारे स्मार्टफोन वापरतात, त्यांना जास्त ताण येतो.
दिवसभर ई-मेल संपर्कात राहिल्याने ताण येतो. सकाळी किंवा रात्री एकदम ई-मेल बघितले तरी ताण येतोच. ई-मेल सेवा वापरणारे व न वापरणारे किंवा कमी वापरणारे यात ई-मेल सेवा सतत वापरणाऱ्यांना ताण जास्त येतो, ई-मेलमुळे व्यक्तिगत जीवनात हस्तक्षेप होतो. एखादी व्यक्ती असा ताण कितपत पेलू शकते यावर हा व्यक्तिगत जीवनावरचा परिणाम अवलंबून असतो.
जेव्हा ई-मेल वापरायचा असेल तेव्हाच लॉग इन करून तो वापरावा, अन्यथा सतत ई-मेल येण्याची व ते समजण्याची जी व्यवस्था स्मार्टफोनमध्ये असते. त्यामुळे सतत व्यत्यय येत राहतो, कारण स्मार्टफोनच्या पडद्यावर तुम्हाला नवीन ई-मेल आला आहे हे कळत असते.
ई-मेलचे दुष्परिणाम :
* नोकरी व व्यक्तिगत जीवनात असमतोल
* व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम
* नोकरीतील कार्यक्षमतेवर परिणाम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Email use from smartphones increases depression risk