भारतासह जगतील प्रमुख पाच उदयोन्मुख अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये स्तनपानास प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय कमी प्रमाणात गुंतवणूक करण्यात येते. त्यामुळे प्रत्येकवर्षी जगभरातील २ लाख ३६ हजार बालकांचा मृत्यू होत आहे. तसेच ११९ अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान यामुळे होत असल्याचे जागतिक स्तनपान अहवालामध्ये म्हटले आहे.

युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर स्तनपान वाढविण्यासाठी जगातील कोणताही देश शिफारस केलेली मानके पूर्णत: पूर्ण करत नाही. त्यामुळे बालकांच्या मृत्यूंमध्ये वाढ होते आहे. चीन, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको आणि नायजेरिया या जगातील प्रमुख पाच उदयोन्मुख अर्थव्यवस्था स्तनपानाबाबतचे प्रबोधन करण्यासाठी अतिशय कमी गुंतवणूक करतात.

प्रत्येक वर्षी निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेले देश स्तनपानाला चालना देण्यासाठी जवळपास २५० दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च करतात. देणगीदार यासाठी फक्त ८५ दशलक्ष अमेरिकन डॉलर प्रदान करतात, असे अहवालामध्ये म्हटले आहे. जागतिक स्तनपान स्कोअरकार्डनुसार १९४ देशांचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये सहा महिन्यापर्यंत फक्त ४० टक्के मुले स्तनपान करतात. आणि फक्त २३ देशांमध्ये स्तनपान करण्याचा दर ६० टक्केपेक्षा अधिक आहे. जन्मापासून पुढील दोन वर्षांपर्यंत स्तनपान करणे आवश्यक आहे. यासाठी देशांनी आवश्यक ते प्रबोधन करावे, अशी मागणी अहवालात करण्यात आली आहे.

स्तनपानाचे प्रमाण वाढविण्यासाठी देशांनी कौटुंबिक रजा आणि कामाच्या ठिकाणी स्तनपान करण्याबाबतचे धोरण तयार करावे, समुदायाला आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात आणि स्तनपानाचे प्रमाण वाढण्यासाठी समुदायाला प्रोत्साहन द्यावे अशी विनंती अहवालामध्ये करण्यात आली आहे. तयार करण्यात आलेल्या धोरणाची अंमलबजावणी होते किंवा नाही याचा मागोवा घेण्यासाठी देखरेख प्रणाली निर्माण करावी, राष्ट्रीय आणि जागतिक स्तनपानाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम आणि आवश्यक तो निधी खर्च करावा, असे या अहवालात म्हटले आहे.