तुम्हाला कधी झोपेत असताना अचानक श्वास घ्यायला त्रास झाला आणि जाग आली आहे का? जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल आणि तुमच्याबरोबर वारंवार असे होत असल्यास लगेच डॉक्टरची भेट घ्या कारण तुम्हाला स्लीप अॅप्निया हा आजार जडल्याची शक्यता आहे. झोपेशी संदर्भातील आजारांपैकी एक असणाऱ्या स्लीप अॅप्निया आजाराने ग्रस्त व्यक्ती सहा तासांहून अधिकवेळ आडवे झोपू शकत नाही. झोपेत असताना श्वास कोंडल्यामुळे जाग येणे, नाक चोंदल्यासारखे होऊन श्वास घ्यायला अडथळा आल्याने उठून बसणे, सतत कूस बदलणे अशी या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. वेळीच या आजारावर उपचार करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास शांत झोपेसाठी या रुगणांना सी-पॅप मशिन वापरावे लागू शकते.
‘स्लीप अॅप्निया’ म्हणजे नक्की काय?
झोपेत श्वास बंद पडण्याच्या प्रकाराला ‘स्लीप अॅप्निया’ असे म्हणता येईल. जगातील दोन ते अडीच टक्के नागरिकांना झोपेमध्ये श्वास बंद पडण्याचा त्रास होतो. झोपेमध्ये घोरणाऱ्या व्यक्तींना हा आजार असण्याची शक्यता जास्त असते. जगभरातील घोरणाऱ्या व्यक्तींपैकी १० टक्के व्यक्तींना ‘स्लीप अॅप्निया’चा आजार असल्याचे निदान झाले आहे. विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते.
‘स्लीप अॅप्निया’चे प्रकार
> ऑबस्ट्रॅक्टीव्ह स्लीप अॅप्निया (ओएसए)
सर्वसामान्यपणे अनेकांना याच प्रकारचा अॅप्नियाचा आजार होतो. यामध्ये श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे श्वास घेण्यासाठी उठून बसावे लागते.
> सेंट्रल स्लीप अॅप्निया
या प्रकारचा अॅप्नियाचा त्रास खूप कमी जणांना होतो. यामध्ये मेंदूकडून स्नायूंना श्वास घेण्यासाठीचा संदेश पाठवला जात नाही. त्यामुळे श्वास घेण्याच्या प्रक्रियेतील ताळमेळ बिघडतो.
‘स्लीप अॅप्निया’ कोणाला असू शकतो
> पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे
> वजन अधिक असल्यास या आजाराच धोका संभवतो
> ४० वर्षांवरील लोकांमध्ये हा आजार अधिक प्राणात दिसून येतो
> मान लांब अणाऱ्यांना हा आजार होऊ शकतो.
> टॉन्सिल्सचा तसेच जीभेचा आकार मोठा असणाऱ्यांनाही स्लीपन अॅप्निया होऊ शकतो.
> जबड्याचे हाड छोटे असणाऱ्यांना हा आजार होऊ शकतो.
> सायनसचा त्रास असणाऱ्यांना स्लीप अॅप्निया होण्याची जास्त शक्यता असते.
‘स्लीप अॅप्निया’मुळे काय काय त्रास होऊ शकतो
> उच्च रक्तदाब
> आकडी येणे
> हृदयाची क्रिया बंद पडणे
> हृदयाचे अनियमित ठोके
> हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते
> मधुमेह
> मानसिक तणाव
> डोकेदुखी