जेवणावेळी किंवा नाष्टय़ावेळी अति प्रमाणात खाद्यपदार्थाचे सेवन करणे चयापचय क्रियेसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता एका अभ्यासात समोर आली आहे. एखाद्या मेजवानीमध्ये आवडता पदार्थ असल्यास अनेक जण जिभेवर ताबा न ठेवता मनसोक्त खातात. ही सवय नंतर चयापचय क्रियेतील आजारांना आमंत्रण देणारी ठरू शकते. आधीच चयापचय क्रियेशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी अशा वेळी जास्त कॅलरी असलेला एखादा शेक जरी प्यायल्यास हा आजार बळावण्याची दाट शक्यता असते.
कमी-जास्त आहार पद्धतीचे शरीरावर होणारे परिणाम शोधण्यासाठी नेदरलँड झेस्टमधील टीएनओच्या मायक्रोबायोलॉजी आणि सिस्टीमस् बायोलॉजी ग्रुपने अभ्यास सुरू केला होता. या वेळी त्यांनी प्रारंभी छोटय़ा परंतु मोठय़ा आजारांना निमंत्रण देणाऱ्या आहार पद्धतीवर लक्ष केंद्रित केले होते. यामध्ये त्यांना जेवण किंवा नाष्टय़ावेळी अधिकचा आहार घेतल्यास पचन संस्थेशी संबंधित विकार बळावत असल्याचे निदर्शनास आले.
सुरुवातीला ही प्रक्रिया कमी प्रमाणात जाणवते. मात्र अशी सवय न सोडल्यास किंवा आधीच आजार असल्यास एखाद्या वेळी जास्त उष्मांक असलेला साधा शेक प्यायल्यास हा आजार मोठा होत असल्याचे निदर्शनास आले.
यासाठी त्यांनी १० सुदृढ पुरुष, ९ चयापचय क्रियेशी संबंधित आजार असलेले पुरुष आणि उच्च रक्तदाब, उच्च मधुमेह यांसारखे आजार असलेल्या पुरुषांवर संशोधन केले. या दोन्ही गटांना सकस आहार, जास्त स्निग्धांश असलेले दूध देण्यात आले. याआधी त्यांचे रक्त तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच सतत चार आठवडे या पुरुषांना १३०० किलो कॅलरी असलेला आहार देण्यात येत होता.
यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. यामध्ये प्रत्येकाचा रक्तदाब, मधुमेह वाढलेला दिसला. तसेच सुदृढ पुरुषांमध्येही चयापचय क्रियेशी संबंधित आजार सुरू होताना आढळून आले. आहाराचे अति सेवन केल्याने सुदृढ गटामध्ये नकारात्मक परिणाम दिसून आले. तसेच यापूर्वी आजार असलेल्या गटामध्येही त्यांचे आजार बळावल्याचे समोर आले.

Story img Loader